देशात कांद्याची टंचाई होऊ नये म्हणून केंद्राने कांदा निर्यात बंदी (Onion producers export issue) केली. या ‘बंदी’मुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट, शरद पवार आणि अजित पवार गट आघाडीवर असून श्रेयासाठी दोघांमध्ये चुरस लागल्याचे दिसून येत आहे.
गोयल यांच्याशी चर्चा
कांदा उत्पादकांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी शरद पवार सोमवार, ११ डिसेंबर रोजी थेट नाशिकला शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणाचे नियोजन सुरु केले आहे. अजित पवार यांनी जाहीर केले की, ते कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली असून केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जावे लागेल.
देशातील ग्राहकांना झळ पोचू नये
दरम्यान फडणवीस यांनीदेखील पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “देशात सुमारे २५-३० टक्के कांदा उत्पादन कमी झाल्यामुळे देशातील ग्राहकांना त्याची झळ पोचू नये म्हणून निर्यात बंदी केली मात्र उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि थोडी निर्यात बंदी उठवावी अशी विनंती करू.”
शरद पवार रास्तारोको आंदोलनात
शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत कांद्यावरील निर्यात बंदी (Onion producers export issue) उठवावीच लागेल असा इशारा दिला असून नाशिक येथील चांदवडमधील रास्तारोको आंदोलनात ते सहभागी झाले. डिसेंबरकांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे, यामधून दोन पैसे मिळतात. शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने कांदा निर्यातबंदी उठवलीच पाहिजे, असे पवार यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community