जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी काहींच्या मनातील धाकधूकही वाढली आहे. कारण, अमित शहांसोबतच्या बैठकीत ठरलेल्या सूत्रानुसार, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त १४ कॅबिनेट मंत्रीच सहभागी करून घेतले जाणार आहेत. त्यामुळे या यादीतून कोणाचा पत्ता कट होणार, याच्या चर्चा भाजपासह शिंदे गटात सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील बैठकीनंतर शिंदे आणि फडणवीस यांनी अमित शाह यांची रात्री भेट घेतली. महाराष्ट्राशी संबंधित अनेक विषयांवर त्यात चर्चा झाली. शाह यांनी जानेवारीअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार करायला हरकत नसल्याचे शिंदे-फडणवीसांना सांगितले. त्यानंतर शहा यांच्यासमोरच मंत्रिपदांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला.
त्यानुसार, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात एकूण २१ मंत्री शपथ घेतील. त्यातील १४ कॅबिनेट, तर ७ राज्यमंत्री असतील. कॅबिनेट मंत्रिपदांपैकी भाजपाला १०, तर शिंदे गटाच्या वाट्याला ४ मंत्रीपदे येणार आहेत. शिंदे गट त्यातील दोन पदे अपक्ष आमदारांना सोडणार आहे. राज्यमंत्री पदांचा विचार करता भाजपामधून ४ आणि शिंदे गटाकडून तीन आमदार शपथबद्ध होतील, असे कळते.
जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होणार?
- सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह २० मंत्री आहेत. त्यातही मोजक्याच मंत्र्यांवर अनेक खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मदतीला राज्यमंत्री नसल्याने अधिवेशन काळात त्यांच्यावर कामाचा मोठा ताण येणार आहे.
- पालकमंत्री म्हणूनही एका मंत्र्यांकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक जिल्हे आहेत. त्याचा ताण जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेवर येत आहे.
- शिवाय मंत्रिमंडळ विस्तार राखडल्याने इच्छुक आमदारांमधील निराशा वाढत आहे. जानेवारीत विस्तार झाला, तर हे सगळेच प्रश्न मार्गी लागतील.
- सध्याच्या मंत्रिमंडळात आणखी २० मंत्र्यांची भर पडली की जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होण्याचीही शक्यता आहे.