शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदार फुटीच्या चर्चांना वेग आल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी तातडीने मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यावा, याबाबत विचारमंथन करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सेनेकडून सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात केवळ पंधरा मिनिटे चर्चा झाली. त्याऐवजी खासदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्यावर ठाकरेंचा भर होता.
१८ पैकी पाच खासदार अनुपस्थित
या बैठकीला १८ पैकी पाच खासदार अनुपस्थित होते. हजर असलेल्यांपैकी अनेकांनी याआधीच द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याबाबत उघड भूमिका मांडली असल्याने खासदारांच्या मनात काय सुरू आहे, याची पूर्वकल्पना पक्ष प्रमुखांना होती. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर त्यांनी फार वेळ भाष्य केले नाही. थेट मुद्द्याला हात घातला. आपण काही वेगळा विचार करत आहात का, अशी विचारणा ठाकरेंकडून करण्यात आली. त्यावर, महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत युती करावी, असा आग्रह बहुतांश खासदारांनी धरला. भाजप हाच आपला नैसर्गिक मित्र असून, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्याला कधीच साथ देणार नाहीत, अशी भूमिका अनेक जणांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीला तडे जाण्याची शक्यता
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करणे, ही सर्वात मोठी चूक होती. आपल्याला भाजपसोबत जाण्याचा जनादेश मिळाला होता. त्याचा अनादर झालेला असला, तरी अद्याप वेळ गेलेली नाही. झाले-गेले सर्व विसरून पुन्हा भाजपसोबत एकत्र बसू, अशी मागणी खासदारांकडून करण्यात आली. त्यावर, भाजपच्या काही ‘शेलपटांनी’ शिवसेना आणि तिच्या नेतृत्त्वावर अत्यंत घाणेरड्या शब्दांत गरळ ओकली, नको नको ते आरोप केले. असे असताना त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसायचे, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. परंतु, काहीही करा आणि भाजपसोबत चला. त्यांच्यासोबत गेलो नाही, तर त्याचा मोठा फटका आम्हा सगळ्यांना बसेल. पुन्हा निवडून येणे कठीण होईल, अशी भूमिका काही खासदारांनी मांडली. त्यावर आपल्या सूचनांचा विचार करू, असे आश्वासन देत उद्धव ठाकरे यांनी बैठक समाप्त केली.
दरम्यान, शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीचा शिवसेनेविषयीचा सूर काहीसा बदलला आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना जाहीर पाठिंबा दर्शविल्याने महाविकास आघाडीला तडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community