निलंबनानंतर फडणवीस आणि निलंबित आमदारांचा संताप! काय आहेत प्रतिक्रिया?

निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदारांनी सरकारवरचा संताप व्यक्त केला आहे.

तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर आमचे संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न करुन, सभागृहात विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला. या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदारांनी सरकारवरचा संताप व्यक्त केला आहे.

आमचा संघर्ष चालूच राहील

आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती, ती सरकारने खरी करुन दाखवली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आणि या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसं गेलं, हे आम्ही दाखवून दिल्याने सरकारने आमच्या 12 आमदारांवर खोटे आरोप करत, ही निलंबनाची कारवाई सूडबुद्धीने केली आहे. पण ओबीसी आरक्षणासाठी 12 काय आमच्या 106 आमदारांचे एक काय, 5 वर्षांसाठी निलंबन झाले तरी आमचा संघर्ष चालूच राहील, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचाः अधिवेशनात ‘राडेबाजी’! भाजपचे 12 आमदार निलंबित… कोण आहेत ‘ते’ आमदार?)

निलंबन करण्यासाठी रचले कथानक

याआधीही अनेकदा सभागृहात असे प्रकार घडलेले आहेत, अध्यक्षांच्या दालनात आधीही अनेकदा बाचाबाची झाली आहे. पण आजवर कोणाचेही निलंबन करण्यात आले नाही, पण जाणीवपूर्वक एक कथानक रचून ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपच्या एकाही आमदाराने शिवी दिलेली नाही. शिवी कोणी दिली हे सगळ्यांनी बघितलेले आहे. शिवसेनेच्या सदस्यांनी तिथे येऊन भाजप आमदारांना धक्काबुक्की केली, त्यानंतर भाजप आमदार आक्रमक झाले. पण आम्ही त्यांना बाजूला केले आणि या प्रकाराबाबत आमदार आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांची माफी मागितली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. तो विषय तिथेच संपला होता. पण सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून आमच्या आमदारांचे निलंबन करण्यासाठी एक कथानक तयार केले आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हे तालिबानी सरकार- शेलार

हा सगळा प्रकार बघितला की असे वाटते की हे नवे तालिबानी आहेत. हे असे तालिबानी राज्यात आहेत याचा मी निषेध करतो, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर आगपखड केली आहे. मी स्वतः आमच्या पक्षाचे सदस्य जे पीठासीन अधिकाऱ्यांसमोर गेले त्यांना ओढून आणले. आमच्या सदस्यांना मी खाली खेचून आणले. संपूर्ण पक्षाच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो असे मी भास्कर जाधव यांना म्हणालो. पण तरीही आमच्यावर ही कारवाी करण्यात आली, हे अत्यंत निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार यांनी दिली.

(हेही वाचाः विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की! काय आहे कारण?)

सीसीटीव्ही फुटेज समोर आणा

हे एक षडयंत्र आहे. अध्यक्षांच्या दालनात जे काही झाले त्याचे सीसीटीव्ही फुटेज सरकारने समोर आणावे त्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. ज्या शिवसेना आमदारांनी तिथे येऊन धक्काबुक्की केली त्यांचं निलंबन का करण्यात आलं नाही, असा सवाल भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे.

बहुमताचा वापर करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबायची महाविकास आघाडीची पद्धत आहे. या सर्व प्रकरणावर पडदा पडल्यानंतर त्याचा पुन्हा पुन्हा सभागृहात उल्लेख करणं हा मुस्कटदाबीचाच प्रयत्न आहे. भाजप आमदारांनी शिवीगाळ केली असेल तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ते सिद्ध करावं.

– योगेश सागर, भाजप आमदार

(हेही वाचाः संकटात महाविकास पाठीशी राहिली नाही! सरनाईकांनी ‘त्या’ पत्रामागील मांडली व्यथा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here