आम्ही सरकारविरुद्ध न्यायालयात जाऊ! फडणवीस आक्रमक

97

राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरुन आता भाजप नेते आक्रमक झाले असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रविण दरेकर यांच्यावरील कारवाई हा राजकीय सूडातून झाली असून हे जर का थांबलं नाही, तर आम्ही राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाऊ, असा थेट इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

आमचा आवाज बुलंद राहील

दरेकर यांच्यावरील कारवाई अयोग्य असल्याचे सांगत, विरोधी पक्ष नेत्यांवर अशाप्रकारे कारवाई करणं हे आजवरच्या इतिहासात या महाराष्ट्रात कधीच घडलं नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे सरकारला जर वाटत असेल की अशाप्रकारे कारवाई करुन आपण विरोधी पक्षाचा आवाज दाबू शकू, तर तसं होणार नाही आमचा आवाज बुलंद राहील, असे चोख उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले आहे.

(हेही वाचाः #HijabControversy: शैक्षणिक संस्थेत हिजाब योग्य की अयोग्य? काय म्हणाले उच्च न्यायालय)

आता आम्ही यादी देणार

आम्ही आता सरकारला मजूर संस्थेचे अध्यक्ष कोण कोण आहेत त्याची यादी देणार आहोत. मग हे सरकार कोणाकोणावर गुन्हा दाखल करतं ते आम्हाला पहायचं आहे. तसं जर झालं नाही तर या सरकार विरुद्ध आम्ही न्यायालयात जाऊ, असा थेट इशारा फडणवीस यांना सरकारला दिला आहे.

हे अजित दादांनी सुद्धा मान्य केले आहे

प्रविण दरेकर यांच्यावर कारवाई होणार हे मी कालंच सभागृहात सांगितलं होतं. प्रविण दरेकर हे मजूर संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महाराष्ट्रातील कुठलीही मजूर संस्था जर आपण घेतली त्यांच्या अध्यक्ष पदावर सगळ्या पक्षांचे आमदार आहेत. कुठल्याही बँकेत निवडून आलेली व्यक्ती ही कुठल्यातरी राजकीय पक्षातील आहे. या सभागृहातील अनेक आमदार हे मजूर संस्थांचे अध्यक्ष असल्याचे अजित पवार यांनी देखील मान्य केले आहे. तरी देखील विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी दरेकरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः भाजप अडचणीत! ‘या’ प्रकरणी प्रविण दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.