मंत्री विभागाचे राजे, प्रत्येक विभागात एक-एक वाझे! फडणवीसांचा सरकारवर हल्ला

महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचाराने बरबटलेलं सरकार आजवर कधी झालं नाही.

150

राज्य सरकारवर कायम आगपखड करणा-या देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील भ्रष्टाचार आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामध्ये जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का? या राज्यात सरकारचं अस्तित्त्व आहे का? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे, अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

भ्रष्टाचाराने बरबटलेलं सरकार

साधारणपणे राज्यात एक मुख्यमंत्री असतात पण ठाकरे सरकारमधले मंत्री, राज्यमंत्री सुद्धा स्वतःला मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे सरकार आहे की सर्कस आहे, अशा प्रकारचा प्रश्न पडत आहे, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचाराने बरबटलेलं सरकार आजवर कधी झालं नाही, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

(हेही वाचाः अजित पवारांविरोधातील ‘तो’ प्रस्ताव आशिष शेलार विसरले?)

हे मृत्यूच्या सापळ्याचं मॉडेल

कोविड काळात महाराष्ट्र सरकारची काही जण पाठ थोपटतात, तेव्हा त्यांना तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारावासा वाटतो. देशात कोविडचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोविडमुळे मृत्यू झालेल्या देशातील व्यक्तींमध्ये तिसरी व्यक्ती ही महाराष्ट्रातील आहे. उत्तर प्रदेशात गंगा नदीत मृतदेह सापडल्याने, महाराष्ट्रात मोठा हाहाकार माजला, पण बीड जिल्ह्यात 22 मृतदेह कोंबून ठेवले जातात, त्याचं काय? मुंबईशिवाय महाराष्ट्रात दुसरे कुठले जिल्हे नाहीत का? मुंबईत जितकी कोविड सेंटर बांधण्यात आली, तितकी इतर कुठल्या जिल्ह्यांत झाली का? हे कुठलं महाराष्ट्र मॉडेल? हे तर मृत्यूच्या सापळ्याचं मॉडेल आहे, अशी झणझणीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

म्हणून दोन दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याचा डाव

या सरकारला मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र दिसत नाही. कोविड काळात मुंबईत इतकी कोविड सेंटर उभारण्यात आली. मग नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये कोविड सेंटर का उभारण्याती आली नाहीत. कोरोना काळात या सरकारने अनेक घोटाळे केले आहेत. राज्यात वसुली सरकार आहे. आता एक वाझे सापडला आहे. पण प्रत्येक विभागात असे अनेक वाझे आहेत आणि त्यांचे पत्ते आमच्याकडे आले आहेत. त्यामुळेच सरकारने अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्याचा डाव केला आहे. भ्रष्टाचार आणि गोंधळ बाहेर येईल म्हणून हे सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

(हेही वाचाः विमानतळला ‘दि.बां.’चे नाव देण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम! )

तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा…

ओबीसी आरक्षणासाठी 26 जून रोजी आपण आंदोलन करणारच आहोत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेले आहे, यासाठी सरकारमधील कोणत्याही व्यक्तीला आव्हान द्यायला मी तयार आहे. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण देखील टिकवून धरलं. पण ठाकरे सरकार हे आरक्षण वाचवण्यात अपयशी ठरलं आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसींच्या हक्कांचा या सरकारने मुडदा पाडला, या सरकारच्या मंत्र्यांना इम्पिरिकल डाटाचा अर्थ कळतो की नाही? मराठा आरक्षणासाठी 5 महिन्यांमध्ये आम्ही इम्पिरिकल डाटा तयार केला, तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही चार महिन्यांत ओबासींचा इम्पिरिकल डाटा तयार करुन देऊ, नाहीतर आम्ही पदावर राहणार नाही, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच ओबीसींचं आरक्षण मिळवून देईपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही. ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

हे सरकार आत्मविश्वासाने दिवस-रात्र खोटं बोलण्याचं काम करत आहे. यांनी लोकशाही कुलुपबंद केली आहे. पण कोणीही कितीही कुलूप लावायचा प्रयत्न केला तर ज्याप्रमाणे 1975 साली आणीबाणीविरोधात आमचा पक्ष लढला तसंच आम्ही याही वेळी लढू, असा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

(हेही वाचाः पुण्याच्या आंबिल ओढा येथे स्थानिकांचा आक्रोश! काय आहे प्रकरण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.