सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा, अशी काही परिस्थिती नाही. जर निर्बंध लावणार असाल, तर राज्य सरकारने विरोधकांना विचारात घेणे गरजेचे आहे. तसेच तज्ज्ञांचे विचार जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. टीव्ही 9 मराठी या वृत्त वहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते.
कोरोनाची संधी साधली
महाराष्ट्रात कोरोनाचे जेवढे मृत्यू झाले ते देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. ३५ टक्के देशातील मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. ४० टक्के मृत्यू राज्यात आहेत. सर्वाधिक अफेक्टेड राज्य महाराष्ट्र आहे. हे सर्व होत असतानाही शेतकऱ्यांना मदत नाही. बाराबलुतेदारांना आर्थिक मदत नाही. इतर छोट्या राज्यांनी बलुतेदारांना मदत केली. राज्य सरकारने एकाही शेतकऱ्याला मदत दिली नाही. आमच्या काळात 15 हजार कोटी विम्याचे मिळाले. यांच्या काळात 500 कोटीही मिळाले नाहीत. त्यामुळे संधीचे रुपांतर कशात, हे मला कळत नाही. मला एवढं लक्षात आलं की संकटात काही संधी साधू या सरकारमध्ये होते. त्यांनी संधी साधली आणि आपले खजाने भरले, असा आरोप त्यांनी केला.
(हेही वाचा महाविकास आघाडी सरकारची २ वर्ष आणि १० संघर्ष! जाणून घ्या कोणते…)
कोरोनाकाळात राज्य रामभरोसे
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेपेक्षाही कोरोनाच्या काळात खरंच जनतेपर्यंत कोण गेलं हो… चला, मुख्यमंत्र्यांच्या काही शारीरिक अडचणी असतील समजूया. म्हणून ते गेले नाही. मंत्री का गेले नाही, पालकमंत्री का गेले नाही…जनतेचे दुःख का बघितले नाही. मी महाराष्ट्रात तीनवेळा फिरलो. मी आयसीयूत गेलो. लोकांची दुख समजून घेतले. विरोधी पक्षनेता म्हणून माझे ते कामच होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रशासनालाही आनंद व्हायचा. आम्हाला कोणी सांगायलाही नाही आणि विचारायलाही येत नाही, असे ते सांगायचे. मी त्यांना म्हटले मी विरोधी पक्षनेता आहे, मी तुमचे फार काही करू शकेन असे नाही. त्यावर किमान तुम्ही आमचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचू शकाल, असे ते म्हणाले. त्यामुळे एकूणच या कोरोनाच्या काळात सरकारचे अस्तित्वच नव्हते, असेही फडणवीस म्हणाले.
सरकार जाणीवपूर्वक अधिवेशन टाळते
अंगावर आले की फेकून द्यायचे, अशी यांची वृत्ती आहे. सरकार आहे पण शासन नाही. कुठल्या खात्यात शासन दिसते. या सरकारमध्ये बदल्यांचा भ्रष्टाचार आहे. बदल्यांची फॅक्टरी आहेत. केवळ पैशांच्या देवाण-घेवाणीने बदल्या होतात. मग अशी माणसे टार्गेट घेऊनच काम सुरू करतात. त्यांना नजर वर करून विचारायची हिम्मत यांच्यात असू शकत नाही. राज्यात, जिल्ह्यात नेक्सेस आहे. अवैध दारू, वाळू, वाहतूक, सट्टा असे खूप मोठे जाळे आहे. हे कोणीही थांबवणार नाही. त्याला दिलेल्या पैशाची वसुली करायची आहे. पैसे घेतल्यानंतर त्यांना विचारायची हिम्मत नाही. त्यामुळेच यांना अधिवेशन घ्यायचे नाही. कारण तिथे विरोधक जाब विचारतात, असा आरोप फडवीस यांनी यावेळी केला. सरकारच्या लालफितशाहीमध्ये आगप्रतिबंधक गोष्टीही अडकल्या. भंडाऱ्यात मुलांचा मृत्यू झाला. सरकारने दीड वर्ष कारवाई केली नाही. आग लागू शकते. मात्र, ती कशामुळे लागते. ते शोधून काढणार की नाही. प्रतिबंध करणार की नाही, या साऱ्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, असे खडेबोल त्यांनी सुनावले.
Join Our WhatsApp Community