नारायण राणे यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हात उचलण्याचे वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. नारायण राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची भाषा होत असताना, आता भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. राणेंनी केलेल्या विधानाचं आम्ही समर्थन करत नाही, पण नारायण राणे यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा राहील, असे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.
(हेही वाचाः केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंना अटक होऊ शकते का? काय म्हणतो कायदा?)
काय म्हणाले फडणवीस
मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीबाबत बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष विसरतात यामुळे एखाद्या वेळी कोणाला संताप येऊ शकतो आणि तो निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. पण त्यावर सरकारद्वारे ज्या पद्धतीने कारवाई केली जात आहे, त्याचं अजिबात समर्थन करता येणार नाही. त्यामुळे सूडबुद्धीने सरकार जर नारायण राणे यांच्यावर कारवाई करत असेल, तर भाजप राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, पण नारायण राणे यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा राहील, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
(हेही वाचाः हिंदुत्वाशी गद्दारी करत मुख्यमंत्रीपद मिळवले! राणे पुन्हा गरजले)
हे तालिबान नाही
कुठल्याही कायदेतज्ज्ञाला विचारलं तर हा दखलपात्र गुन्हा नाही. पण आता तो सरकारने कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन दखलपात्र केला आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना अटक करताना नोटीस दिली पाहिजे. हे तालिबान नाही आहे, इथे कायद्याचे राज्य चालते. त्यामुळे अशाप्रकारे कारवाई होत असेल तर भाजप ते कदापिही सहन करणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
पोलिसजीवी सरकार
शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येऊन भारत मातेला शिव्या घालतो, हिंदूंना खुनी म्हणतो, तेव्हा त्याच्यावर सरकारकडून कुठलीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. पण भाजपच्या मंत्र्यांनी विधान केले तर त्यांना पकडण्यासाठी मोर्चेबांधणी केली जाते. त्यामुळे एकप्रकारे पोलिसांचा गैरवापर सरकारकडून सुरू असून, हे पोलिसजीवी मविआ सरकार आहे, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. सरकारने बस म्हटल्यानंतर काही जण आता लोटांगण घालत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आता राहिले नाही. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलिस काम करू लागले, तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही. आधीच या सरकारच्या काळात जे वसुलीकांड सुरू आहे, त्याने पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
(हेही वाचाः राणेंच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांचा राडा! पोलिसांनी केला लाठीचार्ज)
जन आशीर्वाद थांबणार नाही
पोलिसांच्या भरवशावर भाजपला रोखण्याचा प्रयत्न 50 वर्षे करण्यात आला. पण भाजप थांबलेले नाही आणि थांबणार नाही. त्यामुळे आमची जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजप कार्यालयावरचे हल्ले आम्ही कदापिही सहन करणार नाही. आम्ही राडे करणारे नाहीत, पण आमच्या कार्यालयांवर कोणी हल्ला केला आणि पोलिस काहीच करत नसतील, तर आमच्या कार्यालयांचे संरक्षण करायला भाजप कार्यकर्ते सक्षम आहेत.
नौटंकी पहायला मिळाली
मुख्यमंत्र्यांनी लाथा मारा म्हटलं तर तो ठाकरी बाणा आणि इतर कोणी काही बोललं तर ती जीभ घसरली, असा दुटप्पीपणा सरकारकडून चाललेला आहे. नौटंकी काय असते ते आम्ही आज पाहत आहोत. तू मार, मी रडतो अशाप्रकारचा प्रकार सध्या शिवसेनेकडून चालू आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
(हेही वाचाः शिवसेनेचा विरोध तरी जन आशीर्वाद यात्रा सुरु! चिपळूण, मुंबईत राडा!)
काय म्हणाले होते नारायण राणे?
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयात भाषण करताना मुख्यमंत्री हिरक महोत्सव म्हणत होते, त्यांना अमृत महोत्सव हे माहित नव्हते, मी तिकडे असतो तर कानाखाली मारली असती, असे वक्तव्य राणे यांनी वक्तव्य केले होते.
Join Our WhatsApp Community