हे तर शिवसेना-भाजप युतीचे संकेत! फडणवीस झाले मवाळ

शिवसेनेवर टीका करणारे फडणवीसांचे बोल आता अचानक कसे काय बदलू लागले?

72

लवकरच राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची चर्चा रंगलेली असताना, आता शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये देखील पूर्वीचे प्रेम हळूहळू दिसू लागले आहे. शिवसेनेमुळे विरोधी बाकावर बसू लागल्याने मागील वर्षभर शिवसेनेला झोडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची भाषा देखील आता बदलू लागली आहे. आता तर पत्रकार परिषदेत शिवसेनेसोबत आमचे शत्रुत्व कधीच नव्हते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेवर टीका करणारे फडणवीसांचे बोल आता अचानक कसे काय बदलू लागले, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

फडणवीस म्हणाले आमच्यात शत्रुत्व नाही

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये शत्रुत्व कधीच नव्हते, फक्त वैचारिक मतभेद होते. निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने आमचा हात धरुन विरोधी पक्षाविरोधात निवडणूक लढवली, तीच शिवसेना निवडणुकीनंतर मात्र विरोधकांचा हात धरुन गेली. त्यामुळे आमच्यात आणि शिवसेनेत शत्रुत्व नाही पण वैचारिक मतभेद आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना उद्या आमच्यासोबत येण्यासाठी तयार असेल तर या जर तरच्या गोष्टी नाहीत, काळ पाहून निर्णय घेता येईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे आशिष शेलार यांच्यात झालेली भेट ही माझी मुलाखत घेण्यासाठीची तयारी म्हणून झाली असावी, असे देखील फडणवीस म्हणाले.

(हेही वाचाः अधिकारी माश्या मारायला बसवलेत का? फडणवीसांचा संताप)

आठवले म्हणाले माझं ऐकलं असतं तर..

रविवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपची ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता, की शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देऊन टाका. माझं जर ते म्हणणं फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणाले. आठवले एवढंच बोलून थांबले नाहीत, तर तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा असंही त्यावेळी मी सांगितलं होतं, अशी आठवणही आठवलेंनी सांगितली.

राज्यात भेटीगाठी वाढल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जून महिन्यात राज्याचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळाने मोदींशी पावणे दोन तास चर्चा केली. या पावणे दोन तासांतील अर्धा तास मोदी-ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना या एकांतातील भेटीबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा मी मोदींनाच भेटायला गेलो होतो. नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असं उत्तर ठाकरेंनी दिलं. मोदी आणि आमचं नातं घट्ट असल्याचंही ते म्हणाले होते. तर संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात देखील शनिवारी भेट झाली होती.

(हेही वाचाः बापरे! ठाकरे सरकारने प्रसिद्धीसाठी खर्च केले कोट्यावधी रुपये)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.