राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौ-यावर आहेत. त्यांचा हा दौरा म्हणजे मुखवटा असून त्यामागे दडलेले राजकारण हा खरा चेहरा असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले होते. यावरुन सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना फडणवीसांनी रोखठोक उत्तर दिले आहे.
लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी राऊतांना प्रत्तुत्तर दिले. केवळ अग्रलेख लिहणा-या नेत्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
(हेही वाचाः यासाठीच ‘मी सर्व मंत्र्यांचे लाल दिवे काढून घेतले!’ गडकरींनी सांगितले कारण)
अग्रलेख लिहून मोठे झालेले नेते
जे ऑफिसमध्ये बसून टीका करतात, राजकारण करतात त्यांना प्रत्यक्ष राबणा-या शेतक-याची परिस्थिती समजू शकत नाही. त्यांनी कधीही शेतक-यांना भेट दिली नाही, त्यांचं सांत्वन केलं नाही, त्यांचे अश्रू पाहिले नाहीत. जर का त्यांनी हे पाहिलं असतं तर असं बोलायची त्यांची हिंमतच झाली नसती, अशा आक्रमक शब्दांत फडणवीस यांनी राऊतांचा समाचार घेतला. त्यामुळे असे अग्रलेख लिहून आलेल्या कागदावरच्या नेत्यांना मला उत्तर द्यायचे नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
विदर्भ-मराठवाडा विरोधी सरकार
विदर्भ-मराठवाड्यातील शेतक-यांवर होणा-या अन्यायाबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. हे विदर्भ, मराठवाडा विरोधी सरकार आहे. या सरकारने पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर वैधानिक विकास मंडळाची हत्या करुन विदर्भ-मराठवाड्याचा संवैधानिक अधिकार काढून टाकला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
(हेही वाचाः ‘या’ शिवसेना खासदाराच्या मते अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री)
मुख्यमंत्र्यांना दौरा करायचा नसेल तर…
मुख्यमंत्री सोडाच पण मराठवाड्यातील अनेक पालकमंत्र्यांनीही त्यांच्या जिल्ह्यांची पाहणी केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तात्काळ दौरा करायची गरज आहे. त्यांना जर यायचं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी किमान शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करुन त्यांना तात्पुरती मदत द्यावी. आता शेतक-यांना कुठलीच मदत मिळत नसून हे खूप वाईट आहे. हे संवेदनाहीन सरकारचे लक्षण असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community