आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका, दरेकरांचा सरकारला इशारा!

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच आहे. महागाई भत्ता आणि घरभाडे वाढीबाबतची मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत अद्याप तोडगा निघू शकला नाही. तसेच एसटी कर्मचा-यांवर रोज निलंबनाची कारवाई सुरू आहे. आता यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी  आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

ब्रिटीश नीती वापरुन, आंदोलन फोडण्याचा प्रयत्न

कर्मचाऱ्यांचे आंदोलन कसे चिरडता येईल, याचा नियोजनबद्ध प्लँन परिवहनमंत्र्यांचा दिसतोय. एका बाजूला निलंबन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि एसटी कर्मचाऱ्यांना सांगतात की, आता तुम्हाला पगार मिळणार नाही. मग या कर्मचा-यांचे घर कसे चालणार? याला युनियनचे काही लोक सपोर्टिंग कामे करतायत. अशा प्रकारची ब्रिटिश नीती वापरून आंदोलन फोडता येईल का असा सरकारचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आम्हाला आता तिसरा डोळा उघडायला लावू नका, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारला दिला.

कर्मचा-यांबरोवर चर्चाच करायची नाही

एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आज दरेकर यांनी आझाद मैदान येथे आंदोलनस्थळी भेट दिली. एसटी कर्मचा-यांची विचारपूस केली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते.  हा प्रश्न अहंकाराचा, प्रतिष्ठेचा करू नका. रोज एसटी कर्मचारी मृत्यूला कवटाळतायत. आजही हृदयविकाराने एका कर्मचा-याचा मृत्यू झाला. त्याला या सर्व प्रकाराने धक्का बसला आणि तो मृत्युमुखी पडला. परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे कर्मचा-यांचे शिष्टमंडळ गेले तेव्हा ज्या पद्धतीने त्यांची चर्चा झाली, ती अत्यंत तुसड्या पद्धतीने झाली. पिण्यासाठी पाण्याचा ग्लासही उपलब्ध झाला नाही. मंत्र्यांनी सांगितले की मला कर्मचाऱ्यांबरोबर चर्चाच करायची नाही. युनियन त्यांच्या संपर्कात आहे आणि युनियनशी चर्चा करणे त्यांना सोयीचे वाटते या शब्दात मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले.

सरकारची भुमिका आडमुठेपणाची

एसटी कर्मचा-यांचे आंदोलन आता युनियनच्या हातात राहिले नाही, कोणत्या नेत्याच्या हातात राहिले नाही. हे आंदोलन कर्मचाऱ्यांचे झाले आहे, जनतेचे झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारने हा प्रश्न कोणाच्याही प्रतिष्ठेचा करु नये.  राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी आता मंत्र्यांना आदेशीत करावे आणि विलिनिकरणाचा प्रश्न निकाली लावावा. परंतु सरकारची जी भुमिका दिसते ती आडमुठेपणाची दिसतेय. बाजूने दिसत नाही. म्हणून आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका, असा थेट  इशाराच त्यांनी महाविकास आघाडी सरकारला यावेळी दिला.

(हेही वाचा :पाकिस्तानचे वांदे; भारतीय नौदलात ‘वेला’)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here