दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय, दरेकरांची टीका

या विषयाला राजकीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत.

काँग्रेस केंद्रात सत्तेत होती त्यावेळी ईडीच्या चौकशीचा दबाव टाकून, सत्ता कशी राखली हे देशाला माहीत आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय संजय राऊत यांना आहे. त्यांच्या टीकेला काडीची किंमत नसून त्यांचे वक्तव्य संदर्भहीन असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

ईडी आणि सीबीआय देशातील स्वायत्त संस्था आहेत. संविधानात लोकशाही इतकी मजबूत आहे की,  देशात कोणाचेही सरकार असो या संस्थांचा चुकीचा वापर करता येत नाही. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. चुकीचे काम केले असेल, त्यांना तपास यंत्रणेच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. पण दुर्दैव हे आहे की, तपासाला सामोरं जात असताना अडचणीत येतील अशी खात्री झाली असावी बहुदा म्हणून या विषयाला राजकीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत, असे दरेकर म्हणाले.

(हेही वाचाः ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम  )

राऊतांना भाजप द्वेषाची कावीळ

आरोप किंवा तक्रार दाखल झाली तर कुठलीही एजन्सी हा तपास करते. त्यामुळे अशाप्रकारे बोलण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही. संजय राऊत यांना भाजप द्वेषाची कावीळ झाली आहे. अभ्यासाविना व अज्ञानापोटी राऊत फडणवीस व भाजपवर टीका करत असतात, असा आरोप दरेकर यांनी केला.

फडणवीसांनी आरक्षण टिकवले

मराठा व ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस सरकारनं काय केलं त्याची माहिती घेऊन बोलल्यास राऊत आरोप करू शकणार नाहीत. फडणवीसांनीच मराठा व ओबीसींना आरक्षणं मिळवून दिली, पण ती महाविकास आघाडीला टिकवता आली नाहीत. ओबीसी राजकीय आरक्षण ज्यावेळेला रद्द झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करुन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षण टिकवून ठेवलं, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांची भाजप आंदोलनावर टीका! म्हणाले, गर्दी जमवून नुसती ताकद दाखवता येते! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here