सरनाईकांच्या पत्रातून शिवसेनेतील अस्वस्थता उघड- दरेकर

सरनाईक यांनी फक्त एकट्या शिवसेना आमदाराची नव्हे, तर शिवसेनेतील सर्वच आमदरांची वस्तुस्थिती उघड केल्याचेही यातून स्पष्ट होते.

110

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र, म्हणजे शिवसेनेच्या अंतर्गत आणि महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय, हे दाखवणारे पत्र आहे. शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, तसेच तळागाळातल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे हे यामधून स्पष्ट दिसत असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

शिवसेना आमदारांच्या मनातील खदखद

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना सत्तेतील प्रमुख पक्ष असून त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे. शिवसेनेची सत्ता असली तरी सत्तेचा उपयोग शिवसेनेला होत नसून, या सत्तेचा पुरेपूर उपयोग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस करुन घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. मग अशा सत्तेचा उपयोग काय? आमदार सरनाईक यांनी फक्त एकट्या शिवसेना आमदाराची नव्हे, तर शिवसेनेतील सर्वच आमदरांची वस्तुस्थिती उघड केल्याचेही यातून स्पष्ट होते, असे दरेकर म्हणाले. आमदार सरनाईक यांच्या पत्राच्या माध्यमातून पंचवीस वर्षे भाजप सोबतची युती, पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आमदारांना मिळालेली वागणूक, तसेच झालेला विकास या सगळ्यांचा तुलनात्मक आलेख समोर येत आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः सरनाईकांचा ‘पत्र’प्रताप… म्हणाले, शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरे!)

संजय राऊत यांनी पत्रातील एकच पॅरा वाचला

शिवसेना नेते संजय राऊत यांना आपल्या पक्षातील आमदारांनी पत्राद्वारे दिलेल्या शिवसैनिकांच्या भावना महत्त्वाच्या वाटत नाहीत. तर त्यांनी फक्त त्या पत्रातील एकच पॅरेग्राफ सेंट्रल एजन्सीच्या मार्फत होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात वाचला. यापेक्षा शिवसेनेचं दुसरं दुर्दैव असू शकत नाही. हे पत्र राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या नाराजी संदर्भात आहे आणि मग संजय राऊत शिवसेनेची काळजी घेतात, की राष्ट्रवादीची काळजी घेतात हे महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण माहिती आहे. पण शिवसेनेचे बदललेले स्वरुप संजय राऊतां सारख्या नेत्यांच्या माध्यमातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी ‘पाळले’, उपमुख्यमंत्र्यांनी ‘तोडले’! मग कोरोनाचे ‘फावले’ तर…?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.