मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मागील एक वर्षाच्या कालावधीतील कामांचे मूल्यमापन करत प्रजाने जाहीर केलेल्या प्रगतीपुस्तकात शीव अँटॉप हिल मधील काँग्रेस नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पहिला क्रमांक पटकावला. प्रजाच्या आजवरच्या नगरसेवकांच्या प्रगतीपुस्तकात प्रथमच विरोधी पक्षनेते असलेल्या नगरसेवकाने पहिला क्रमांक मिळवला आहे. एका बाजूला विरोधी पक्षनेतेपदावर वाद निर्माण झालेला असताना तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यांनी आपले पद टिकवणाऱ्या रवी राजा यांच्यासाठी हे सर्वात मोठे प्रशस्तीपत्रक ठरणार आहे.
हे आहेत टॉप-10
प्रजा फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन करत त्यांचे प्रगतीपुस्तक जाहीर केले जाते. प्रजाच्या या अहवालात पहिल्या टॉप-टेन नगरसेवकांमध्ये पहिल्या क्रमांकावरील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे तरुण नगरसेवक समाधान सरवणकर आणि भाजपचे दहिसरमधील नगरसेवक हरिष छेडा हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर शिवसेनेच्या दहिसरमधील नगरसेविका सुजाता पाटेकर आणि पाचव्या क्रमांकावर मालाडमधील काँग्रेसचे नगरसेवक विरेंद्र चौधरी हे आहेत. शिवसेनेचे सचिन पडवळ आणि भाजपच्या स्वप्ना म्हात्रे या अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहेत. आठव्या क्रमांकावर काँगेसच्या मेहेर हैदर, नवव्या क्रमांकावर भाजपच्या सेजल देसाई आणि दहाव्या क्रमांकावर भाजपच्या प्रिती सातम या आहेत.
(हेही वाचाः अजून किती अभियंते सेवानिवृत्त होण्याची वाट पाहणार महापौर?)
या पक्षाचे आहेत नेते
पहिल्या दहामध्ये काँग्रेसच्या तीन, शिवसेनेच्या तीन आणि भाजपच्या चार नगरसेवकांचा समावेश आहे. तर तळातील सर्वात दहा नगरसेवकांमध्ये भाजपच्या चार नगरसेवकांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अभासे आणि एमआयएम या पक्षाच्या प्रत्येकी एका नगरसेवकांचा समावेश आहे. तळातून पहिल्या क्रमांकावर एमआयएमच्या गुलनाझ मोहम्मद सलीम कुरेशी, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे भाजपचे सागरसिंह ठाकूर आणि शिवसेनेचे परमेश्वर कदम आदी आहेत.
Join Our WhatsApp Community