तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शरद पवार, उद्धव ठाकरेंसह ९ नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र

155

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर देशभरातील भाजपविरोधी राजकीय पक्षांचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह ९ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असून त्यात भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला आहे.

हे आहेत ‘ते’ ९ नेते

पत्र देणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते भगवंत मान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव, जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा समावेश आहे.

तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा जात आहे!

पत्रात विरोधकांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्यांनी सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून कारवाई करून भाजप सोडून इतर राजकीय पक्ष सातत्याने गोत्यात आणले जात आहे. या कारवाईमुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा जात आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे भारताचे एका लोकशाही देशातून हुकूमशाही शासन पद्धतीत रूपांतर झाल्याचे सिद्ध होते. याशिवाय राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यांमध्ये तेढ वाढत असल्याचेही म्हटले आहे. यासोबतच त्यांनी याबाबत चिंताही व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – ..तर उद्धव ठाकरेंना मला आणि माझ्या मुलाला संपवण्यात यश आलं असतं; रामदास कदमांचा गंभीर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.