मुंबई महापालिकेची स्थायी समितीची बैठक झूमद्वारे ऑनलाइन घेण्यास आता सर्वच पक्षांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. या प्रकरणात भाजपने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी एक दिवसाचा अवधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार, गुरुवारी होणारी स्थायी समितीची सभा पुढे ढकलण्यात आली आहे. आता शुक्रवारी १२ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपची उच्च न्यायालयात धाव
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्थायी समितीची बैठक झूमद्वारे ऑनलाइन घेण्याचा निर्णय जारी केला. त्यामुळे या निर्णयाविरोधात भाजपच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर भाजपने कमी वेळात ही सभा आयोजित केल्यामुळे आपल्याला बाजू मांडता येणार नाही, त्यावर मतदान करता येणार नाही, अशी बाजू मांडली. त्यामुळे न्यायालयाने भाजपची बाजू ऐकून घेतल्यानंतर, या बैठकीला शुक्रवारी दुपारी होणाऱ्या सुनावणीपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे महापालिकेच्यावतीने स्थायी समितीची बैठक रद्द करुन शुक्रवारी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
(हेही वाचाः कडक निर्बंधांमुळे फुल शेतीचे मोठे नुकसान! काय आहे वसई-विरारमधील फुल शेतक-यांची व्यथा? वाचा…)
भाजपच्या सूचना
एका बाजूला स्थायी समितीच्या ऑनलाइन कामकाजाबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेली असतानाच, दुसरीकडे भाजपने या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे न घेता प्रत्यक्ष घेणच आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अन्यथा पूर्वीप्रमाणे ४ समित्यांच्या सभा स्थगित करण्यात आल्या होत्या, त्याप्रमाणे पुढील १५ दिवस सभा स्थगित करण्यात याव्यात, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये त्यांनी तीन पर्याय सूचवतानाच फक्त स्थायी समितीच्याच प्रत्यक्ष सभा घ्याव्यात, तसेच स्थायी समितीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील कोविड प्रादुर्भावासंबंधित आलेले प्रस्ताव विचारात घ्यावेत व अन्य प्रस्ताव प्रत्यक्ष सभा होईपर्यंत प्रशासनाने मागे घ्यावेत किंवा स्थगित करावे, अशी सूचना केली आहे.
विरोधी पक्षांचीही मागणी
भाजप पाठोपाठ विरोधी पक्षांनीही झूम व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे होणाऱ्या सभेला विरोध दर्शवला आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आणि समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांच्या स्वाक्षरीने स्थायी समिती अध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी महापालिका सचिव विभागाने झूमद्वारे सभा का घेण्यात येत आहे, याचे कारणच दिले नसल्याचे सांगत यापूर्वीचे निर्बंध नगरविकास खात्याने बजावले होते. पण यावेळी असे कोणतेही निर्बंध नव्हते. त्यामुळे ही सभा झूमद्वारे न घेता प्रत्यक्षच घेतली जावी, अशी मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community