भाजपच्या भीतीने महापालिकेत विरोधी पक्षाची धार बोथट!

महापालिकेतील विकासकामांना विरोध करून सत्ताधाऱ्यांच्या नाड्या आवळण्याची इच्छा असूनही विरोधी पक्ष काँग्रेसला विरोधासाठी उपसलेली तलवार म्यान करावी लागत आहे.

स्वबळाचा नारा देत आगामी महापालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्धार करणाऱ्या काँग्रेस पक्षाची अवस्था अडकित्त्यासारखी झाली आहे. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाला आपला उघडपणे विरोधही नोंदवता येत नाही. विरोध करण्याची इच्छा असली तरी भाजपच्या भीतीने काँग्रेसला सत्ताधारी पक्षालाच पाठिंबा द्यावा लागत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षाची भूमिका खंबीरपणे वठवता येत नाही. परिणामी विरोधी पक्ष महापालिकेत कमजोर होताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्याविरोधात रस्त्यावर आक्रमक असणाऱ्या काँग्रेस पक्षाची भूमिका महापालिकेत अत्यंत सावधानपणाची असल्याचे पहायला मिळत आहे. यावरून महापालिकेत विरोधी पक्षाची विरोधाची धार बोथट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रस्त्यावर विरोध, महापालिकेत मवाळ!

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी काँग्रेस पक्षाने आगामी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळाची तयारी केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी करण्याच्या जोरदार चर्चा रंगल्या जात असल्या तरी काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा देत महापालिकेच्या कामांबाबत टीका करण्यास सुरुवात केली. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसने मुंबईतील खड्डयांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवत एकप्रकारे सत्ताधारी पक्षाला टार्गेट केले होते. परंतु रस्त्यावर महापालिकेच्याविरोधात आक्रमक होत आरोप केले जात असले, तरी महापालिकेत काँग्रेसला ही भूमिका मांडताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

(हेही वाचा : अतिवृष्टीमुळे राज्यभरातील रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान!)

सत्ताधारी सेनेला जपतांना काँग्रेसची गोची 

काँग्रेसने न्यायालयात जावून आपल्याला मिळालेले विरोधी पक्षनेतेपद टिकवले असले तरी विरोधी पक्षाची भूमिका मांडताना त्यांच्यासमोर अनेक पेचप्रसंग निर्माण होत आहेत. महापालिकेतील विकासकामांना विरोध करून सत्ताधाऱ्यांच्या नाड्या आवळण्याची इच्छा असूनही विरोधी पक्षाला विरोधासाठी उपसलेली तलवार म्यान करावी लागत आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी महापालिकेत काँग्रेस पक्ष हा प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडूनही भाजपच्या नगरसेवकांना केवळ पहारेकरी म्हणूनच राहावे लागले आहे. त्यामुळे स्थायी समिती किंवा महापालिकेत विराधी पक्षाला एखाद्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचे झाले तरी भाजपच्या भीतीने त्यांना तसे करता येत नाही. सध्या महाविकास आघाडीचा एकमेव कट्टर शत्रू म्हणजे भाजप असून या पक्षाला कायम बाजुला ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची विरोध करण्याची प्रखर इच्छा असली तरी आपल्या विरोधाला भाजपही पाठिंबा देईल आणि सत्ताधारी पक्ष अडचणीत येईल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भाजपचे मनसुबे पूर्ण होणार नाही याची काळजी काँग्रेस पक्षाकडून घेतली जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर महापालिकेच्या विरोधात आक्रमक असणारा काँग्रेस पक्ष हा महापालिकेत केवळ भाजपच्या भीतीने आक्रमक होताना दिसत नाही. परिणामी विरोधी पक्षाची आक्रमकता महापालिकेत दिसून येत नसल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here