काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे वारंवार देशभरात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करत आहेत, मात्र आता त्याला काँग्रेसमधूनच विरोध होऊ लागला. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या जातिनिहाय जनगणनेबाबतच्या विधानावर टीका करत नराजी व्यक्त केली आहे.
आनंद शर्मा यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रामधून आनंद शर्मा यांनी जातिनिहाय जनगणना हा काही रामबाण उपाय नसल्याचे म्हटले आहे. तसेच असे करणे म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या वारशाच्या अपमान करण्यासारखे ठरेल, असेही आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आनंद शर्मा यांनी काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि व्यापक दृष्टीकोनाची आठवण काढताना या पत्रामधून इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दिलेल्या घोषणांचेही उदाहरण दिले.
(हेही वाचा CM Arvind Kejriwal यांच्या घरी ED चे अधिकारी दाखल; केव्हाही होऊ शकते अटक)
पक्षाची सध्याची भूमिका ही मागच्या काँग्रेस सरकारच्या विचारसरणीसोबत जुळत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधकांना चिखलफेक करण्याची संधी मिळणार आहे, असे आनंद शर्मा यांनी सांगितले. तसेच त्यांनी १९८० मध्ये काँग्रेसने दिलेल्या ‘ना जात पर ना पात पर, मुहर लगेगी हातपर’ या घोषणेचाही हवाला दिला. या पत्रामधून आनंद शर्मा यांनी राजीव गांधी यांच्या एका वक्तव्याचेही उदाहरण दिले आहे. त्यात १९९० मध्ये विरोधी पक्ष नेते असलेले राजीव गांधी यांनी सांगितले होते की, जर आपल्या देशात जातिवाद प्रस्थापित करण्यासाठी जातीची व्याख्या केली जात असेल, तर त्यापासून आम्हाला अडचण आहे.
Join Our WhatsApp Community