राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १ डिसेंबरपर्यंत होती. मात्र, आयोगाचे संकेतस्थळ ऐनवेळी बंद पडल्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात अडथळे येत होते. याबाबत त्यांनी आवाज उठवल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा देण्यासह एका दिवसाची वाढीव मुदत दिली आहे.
विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली.
निर्णय काय झाला?
मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने २ डिसेंबर सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील.
Join Our WhatsApp Community