महापालिकेचा कळस मजबूत, पाया कमजोर

दुहेरी भूमिका बजावणाऱ्या सहाय्यक आयुक्त या बोज्याखाली दबल्याने त्यांना ना स्वत:च्या विभागात धड लक्ष देता येत, ना दुसऱ्या विभागात.

मुंबई महापालिकेच्या तीन सहाय्यक आयुक्तांना बढती देत त्यांची उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. या तिन्ही उपायुक्तांवर विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली. पण या तिन्ही उपायुक्तांना बढती दिल्यामुळे आधीच सहाय्यक आयुक्त पदाच्या ज्या काही जागा रिक्त होत्या, त्या रिक्त जागांमध्ये अजून तीनची भर पडली. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावरील भार वाढवून त्यांच्यावर अतिरिक्त कारभाराची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यासाठी त्यांना तारेवरील कसरत करत कारभार करावा लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता महापालिकेचा कळस मजबूत, पण पाया कमजोर असे म्हणण्याची वेळ आली आहे.

८ पेक्षा अधिक पदे रिक्त

मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय कार्यालयांचे प्रत्येकी एक सहाय्यक आयुक्त, मालमत्ता विभाग, बाजार विभाग, करनिर्धारण व संकलन विभाग तसेच अतिक्रमण निर्मुलन विभागाचे शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर आदींचे प्रत्येकी एक सहाय्यक आयुक्त अशाप्रकारे सुमारे ३०हून अधिक पदे आहेत. यापैकी सध्या आठपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

(हेही वाचाः विविध प्रकल्पांसाठी विशेष निधी निर्माणाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला!)

कायमस्वरुपी सहाय्यक आयुक्त नाही

यापूर्वी मालाड पी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त असलेल्या संजोग कबरे यांना उपायुक्तपदी बढती दिल्यानंतर, या विभागाला अद्यापही कायमस्वरुपी सहाय्यक आयुक्त मिळालेला नाही. पी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. तर एम-पश्चिम आणि सी विभागाचे सहाय्यक आयुक्त निवृत्त झाल्यानंतर तिथे कार्यकारी अभियंत्यांमधून उबाळे आणि हिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

सहाय्यक आयुक्तांवर अतिरिक्त जबाबदारी

त्यानंतर आता करनिर्धारण व संकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.संगीता हसनाळे, आर-मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे आणि आर-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांना बढती देत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांवर अनुक्रमे घनकचरा व्यवस्थापन, परिमंडळ पाच आणि आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे आधीच सहाय्यक आयुक्तपदांच्या जागा रिक्त असून, सध्या प्रत्येक विभागातील कार्यकारी अभियंत्यांची प्रभारी नियुक्ती करण्यात येत असते. पण या बढती मिळालेल्या तिन्ही सहाय्यक आयुक्तांच्या रिक्त जागी नव्याने अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी, या विभागांची अतिरिक्त जबाबदारी आजूबाजूच्या सहाय्यक आयुक्तांवर सोपवली आहे.

(हेही वाचाः ऑक्सिजन प्लांट उभारणी: सीएसआर निधी रुग्णालयांमध्ये, महापालिकेचा निधी कोविड सेंटरमध्ये)

कोरोना नियंत्रणात आणायचा, की महसूल गोळा करायचा?

डॉ.हसनाळे यांच्याजवळ असणारे करनिर्धारण व संकलन विभाग व निवडणूक विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाच्या अतिरिक्त कारभाराची जबाबदारी के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्यावर सोपवली आहे. एका बाजूला विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिम विभागात सध्या सर्वाधिक रुग्ण आढळून येत असताना, त्यांच्यावर अतिरिक्त कारभाराची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे विभागातील कोरोना नियंत्रणात आणायचा, की मालमत्ता कर वसूल करुन महसूल वाढवण्यावर लक्ष द्यायचे, की आगामी निवडणुकीची तयारी करायची?

तोच प्रकार ई-विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांच्या बाबतीत आहे. या सहाय्यक आयुक्तांवर कांदिवली आर-दक्षिण विभागाच्या अतिरिक्त कारभाराची जबाबदारी सोपवली आहे. भायखळा आणि कांदिवली या दोन विभागांकडे या अधिकाऱ्याने कसे लक्ष द्यायचे? कापसे यांच्या बोरीवली आर-मध्य विभागाच्या अतिरिक्त कारभाराची जबाबदारी दहिसरमधील आर-उत्तरच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली.

(हेही वाचाः उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजपने उपसल्या विरोधाच्या तलवारी! शिवसेनेचा मात्र छुपा पाठिंबा)

विभागाचा विकास खुंटतो

यापूर्वी महापालिकेत सहाय्यक आयुक्तांकडे स्वतंत्र विभागाशिवाय अन्य विभागांची जबाबदारी ही अपवादात्मक पहायला मिळायची. परंतु आता महापालिका आयुक्तांच्या नियोजनशून्य कारभारामुळे सहाय्यक आयुक्तांच्या अनेक जागा रिक्त असून, त्यामुळे अनेक विभागांमध्ये सहाय्यक आयुक्तांचे नियंत्रण नसल्याने अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. दोन विभागांची जबाबदारी सांभाळणारे सहाय्यक आयुक्त हे आपला विभाग प्रथम पाहण्याकडे लक्ष देतात आणि अतिरिक्त कारभाराची जबाबदारी असलेल्या विभागाकडे औपचारिकता म्हणून पाहतात. प्रत्येक विभागाला सक्षम सहाय्यक आयुक्त नसल्याने, अनेक विभागांमध्ये नगरसेवकांच्या चांगल्या संकल्पनाही राबवल्या जात नाहीत. तसेच त्या विभागाचा विकास खुंटला जात आहे.

अतिरिक्त भाराचे जड झाले ओझे

तीन सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाल्यानंतर, महापालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांच्या आठ जागा भरण्यासाठी महापालिका अभियंते व कर्मचाऱ्यांमधून एमपीएससीद्वारे परीक्षा घेण्याचे जाहीर केले. परंतु तोपर्यंत काही महिन्यांचा भार इतर सहाय्यक आयुक्तांनाच आपल्या खांद्यावर घेऊन वाहावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतंत्र विभागाची जबाबदारी आहे, ते विभागात चांगले काम करुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहेत. याउलट दुहेरी भूमिका बजावणाऱ्या सहाय्यक आयुक्त या बोज्याखाली दबल्याने त्यांना ना स्वत:च्या विभागात धड लक्ष देता येत, ना दुसऱ्या विभागात.

(हेही वाचाः बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानला उभारी देण्यासाठी भाजपची मागणी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here