अधिकाऱ्यांवरचा अतीविश्वास मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणार का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्र्यांपेक्षा अधिकाऱ्यांवर जास्त अवलंबून असतात, असा सूर दबक्या आवाजात ऐकू येऊ लागला असून, तशी नाराजी देखील दिसू लागली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती जी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली. कुणाला वाटलेही नव्हते, की उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. एरव्ही मातोश्रीवरुन शिवसेना चालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कारभार हाकायचे ‘शिवधनुष्य’ उचलले. उद्धव ठाकरे यांना खरच राज्याचा कारभार करणे झेपेल का? असा त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र महाविकास आघाडीतील मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना विश्वासात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही राज्याचा कारभार पाहत आहेत. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्र्यांपेक्षा अधिकाऱ्यांवर जास्त अवलंबून असतात, असा सूर दबक्या आवाजात ऐकू येऊ लागला असून, तशी नाराजी देखील दिसू लागली आहे.

पवारांकडे तक्रार

आधी काँग्रेस आणि आता तर अधिकाऱ्यांबद्दल राष्ट्रवादीने दंड थोपटले असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांबद्दलच उघड नाराजी व्यक्त केली. आता तर ही ठिगणी इतकी पेटली की, जयंतरावांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तक्रारच महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील अतीविश्वास मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहे का? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

(हेही वाचाः मेहतांनंतर आता कुंटे हटाव मोहीम, मुख्यमंत्र्यांबद्दलही राष्ट्रवादीची नाराजी!)

आधी मेहता, आता कुंटेंवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे माजी प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा विश्वास असल्याचे वारंवार दिसून आले. अजोय मेहता यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यावरुन देखील काँग्रेस, राष्ट्रावादी-काँग्रेसचे मंत्री प्रचंड नाराज झाले होते. ज्या अजोय मेहता यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता, त्यांनाच नंतर मुख्यमंत्र्यांनी प्रधान सल्लागार म्हणून नेमले होते.

(हेही वाचाः मुख्यमंत्री कार्यालयात अजूनही ‘मेहता’गिरी सुरूच)

मुख्यमंत्र्यांची ही स्टाईल नेमकी कोणाची?

अजोय मेहता यांची नुकतीच महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती करण्यात आली असली, तरी देखील आजही त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात मेहतागिरी सुरू असल्याची चर्चा देखील मंत्रालयात होती. तशी बातमी हिंदुस्थान पोस्टने प्रसारित केली होती. एकीकडे अजोय महेता हे मुख्यमंत्र्यांचे मर्जीतले अधिकारी असताना, मेहतांच्या जागी आलेले सीताराम कुंटे देखील मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात. याचमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असून, राष्ट्रवादी काँग्रेसला दाबण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पृथ्वीराज चव्हाण यांची स्टाईल तर वापरत नाहीत ना? असा असा सूर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून ऐकू येत आहे.

(हेही वाचाः कॉंग्रेस-राष्ट्रवादीला नको आहे ‘मेहतागिरी’!)

मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे ऐकणार का?

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कुंटे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर, कुंटे यांना हटवून प्रविण परदेशी यांना मुख्य सचिव करावे, अशी मागणी देखील होऊ लागली आहे. रेमडेसिवीर खरेदीबाबत तात्काळ मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती नेमावी आणि त्यांनी तात्काळ खरेदीबाबत बैठका आणि उपाययोजना कराव्यात, अशा सूचना कॅबिनेटमध्ये देण्यात आल्या होत्या. या उपाययोजना २१ एप्रिलपासून सुरू कराव्यात अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मंत्रिमंडळाने केल्या. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा कॅबिनेटचा निर्णय झालेला असताना, परस्पर अतिरिक्त मुख्य सचिव(वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याने 28 एप्रिलच्या बैठकीत जयंत पाटील नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी खुद्द शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐकणार, की आणखी नाराजी ओढावून घेणार, असा सवाल मात्र उपस्थित होऊ लागला आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती)

प्रदीप व्यास यांच्यामुळेही राष्ट्रवादी नाराज

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या बढतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. प्रदीप व्यास हे आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी अपयशी ठरल्याने त्यांच्याबद्दल मंत्र्यांमध्ये नाराजी होती. मात्र मंत्र्यांच्या दबावानंतरही त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर बढती देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here