काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ नंदुरबारमध्ये येताच महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री तथा माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पद्माकर वळवी हे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत. वळवी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. ते १३ मार्च रोजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. त्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा देखील सुरू केली आहे. या यात्रेची सुरुवात मणिपूर येथून झाली असून यात्रेचा समारोप हा मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार आहे. या यात्रेच्या समारोपासाठी महाराष्ट्रात दाखल झालेल्या राहुल गांधी यांना पहिल्या दिवशी हा मोठा झटका मानला जात आहे.
कोण आहेत पद्माकर वळवी
पद्माकर वळवी यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते राज्याचे क्रीडामंत्री देखील होते. पद्माकर वळवी यांची मुलगी देखील काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्या नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये वर्चस्व असणाऱ्या नेत्यांपैकी ती एक आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात वळवी (Padmakar Valvi) कुटुंबियांचे वर्चस्व आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community