पालघर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २६ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्यावतीने उबाठा शिवसेनेने भारती कामडी यांना उमेदवारी दिलेली असून महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नसला तरी बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार अखेर जाहीर केला. बोईसरचे आमदार राजेश पाटील पहिल्याच दिवशी बविआ पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी अधिकृत उमेदवार अजूनही घोषित झोला नाही. ज्यावेळी पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील तोच उमेदवार शेवटचा आणि अंतिम असेल असे राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बविआचे राजेश पाटील हे डमी उमेदवार ठरणार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Palghar Lok Sabha Election 2024)
सन २०१४ मध्ये भाजपाचे चिंतामण वनगा हे खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर सन २०१८मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना भाजपाने उमेदवारी नाकारली आणि काँग्रेसमधून प्रवेश करणाऱ्या राजेंद्र गावित यांना भाजपाने उमेदवार म्हणून घोषित केले होते. सन २००९मध्ये राजेंद्र गावित काँग्रेसचे आमदार म्हणून विजयी झाले होते, त्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. गावित यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यात राजेंद्र गावित हे २, ७२,७८२ मते मिळवत विजयी झाले होते आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २,४२,२१० मते मिळाली होती, तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना २,२२, ८३८ मते मिळाली होती. (Palghar Lok Sabha Election 2024)
परंतु सन २०१९च्या निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेला सोडण्यात आला आणि त्यासाठी भाजपाचे उमेदवार असलेले राजेंद्र गावित यांना शिवसेनेत पाठवण्यात आले होते. गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत गावित यांना ५,१५,००० मते मिळाली होती, तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ मते मिळाली होती. परंतु आता हाच मतदार संघ पुन्हा एकदा भाजपकडे जाणार असून मतदार संघासोबत राजेंद्र गावित हेही सन २०१९ची पुनर्रावृत्ती करत भाजपात प्रवेश करतील व भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. (Palghar Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Missile Attack: रशियातून भारतात तेल घेऊन येणाऱ्या जहाजावर लाल समुद्रात क्षेपणास्र हल्ला)
बविआकडून ‘या’ नावांची चर्चा
पालघर लोकसभा मतदार हा शिवसेनेकडून आपल्याकडे घेण्याचा आणि राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. मात्र, अद्यापही महायुतीचा उमेदवार ठरला जात नसून महाविकास आघाडीच्या वतीने उबाठा शिवसेनेने या मतदार संघात भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. कामडी यांनी आपला प्रचारही सुरु केला असून स्वत: उध्दव ठाकरे यांनी पालघरमध्ये मोठी सभाही घेतली होती. मात्र, एकाबाजुला महायुतीच्या उमेदवार ठरत नसतानाचा हिंतेद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्यावतीने शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी बोईसरचे विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी अर्ज भरला. आमदार राजेश पाटील यांनी बविआच्या मोजक्याच पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखला केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चांगला योग व मुर्हू असल्याने पक्षनेते हितेंद्र ठाकूर यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. (Palghar Lok Sabha Election 2024)
उबाठा शिवसेनेने उमेदवाराची घोषणा केल्यानंतर बविआने उमेदवाराची घोषणा न करत प्रत्यक्षात उमेदवारी अर्जच दाखल केला. तरीही महायुतीला आपला उमेदवार घोषित करता आलेला नाही. त्यामुळे गावितांना ही उमेदवारी देतात की भाजपा (BJP) आणखी कोणत्या नवीन उमेदवाराला संधी देतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे बविआकडे माजी आमदार मनिषा निमकर या असून या बविआकडून निमकर तसेच विष्णू कडव यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी बविआकडून अन्य उमेदवारांचे अर्ज भरले जाऊ शकतात असेही बोलले जात आहे. त्यामुळे राजेश पाटील हेच अधिकृत उमेदवार ठरतात की डमी उमेदवार ठरतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Palghar Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Reliance Retail : रिलायन्स रिटेल्स कंपनी आता देशातील सगळ्यात मोठी रिटेल उद्योग कंपनी)
आतापर्यंत निवडून आलेले खासदार
सन २००९ मध्ये : बळीराम जाधव, बहुजन विकास आघाडी
सन २०१४ मध्ये : चिंतामण वनगा, भाजपा
सन २०१८ : राजेंद्र गावित, भाजपा, पोटनिवडणूक
सन २०१९ : राजेंद्र गावित, शिवसेना (Palghar Lok Sabha Election 2024)
सन २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल
शिवसेना : राजेंद्र गावित, ५,१५, ००० मतदान
बविआ : बळीराम जाधव, ४,९१,५९६ मतदान
वंचित : सुरेश पाडावी, १३,७२८ मतदान (Palghar Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community