आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी, २० जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची भक्तीभावाने पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी ‘कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे आणि पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे’, असे साकडे शासकीय महापूजेच्या वेळी घातले.
विठ्ठला, भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटू दे, वारकऱ्यांनी तुडूंब, आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेले पंढरपूर पाहायचे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापुजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.
(हेही वाचा : स्वतः गाडी चालवून मुख्यमंत्री पोहचले विठुरायाच्या चरणी!)
कोलते दांपत्याला मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान
आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) दाम्पत्याला महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षापासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचे फळ मिळाले आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावे, असे मागणे असल्याचे केशव कोलते यांनी सांगितले. 1972 पासून वारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community