पंकजा मुंडे… भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री. मात्र गेल्या काही दिवसांपासून पंकजाताई पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद देण्यात न आल्याने, त्यांचे कार्यकर्ते अधिकच नाराज झाले आहेत. याचाच प्रत्यय सोमवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद दौऱ्यावेळी पहायला मिळाला. पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मात्र कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी नंतर पंकजा मुंडे संतापल्या असून, त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच झापले.
पंकजा मुंडेंचा संताप
तुमच्यावर असे संस्कार आहेत का? हा काय दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का?, असं वागणं मला चालणार नाही. असेच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका, असे म्हणत पंकजा संपातून निघून गेल्या. नवनियुक्त मंत्री भागवत कराड यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे. भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावरुन सुरू झाली. यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि यात्रेला सुरुवात केली. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचाः दिल्लीत बस्तान बसवण्यासाठी ‘धनुष्या’ला हवाय ‘हात’!)
अशी आहे कराडांची यात्रा
भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. भव्य जन आशीर्वाद यात्रा… 16 ते 21 ऑगस्ट 2021. मुंडे साहेबांचा आशीर्वाद व जनतेच्या पाठिंब्यामुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशीर्वाद घ्यायला, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलं आहे. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलं आहे. भागवत कराड केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचे लोक म्हणतात.
Join Our WhatsApp Community