केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक नाराज आहेत. पण त्याचबरोबर राज्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे यासुद्धा या निर्णयामुळे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. पण या चर्चांमध्ये कुठलेही तथ्यं नाही, आपल्या मनात पक्ष आणि पक्ष श्रेष्ठींबाबत कोणतीही नाराजी नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर पडदा टाकला आहे.
आमच्या मनात नाराजी नाही
भाजपमध्ये कायमंच नव्या चेह-यांना संधी दिली जाते, तशी पक्षाची संस्कृती आहे. त्यामुळे नवीन लोकांना संधी देण्यात काही गैर नाही. पण प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आमच्या समर्थकांमध्ये नाराजी असणं हे स्वाभाविक आहे. कारण प्रीतम मुंडे विक्रमी मताने निवडून आलेल्या आहेत. त्यांच्याकडे नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे, त्या हुशार आणि तरुण आहेत. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत असणं हे योग्यच होतं. त्यामुळे समर्थकांची नाराजी मी समजू शकते. पण नक्कीच आम्ही त्यांची समजूत घालू. पण पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमच्या मनात कुठलीही नाराजी नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः मुंडेंच्या लेकीचा मोदींना विसर?)
मंत्र्यांनी विश्वास सार्थ ठरवावा
भाजपमधून मला संपवण्याचा कोणताही प्रयत्न होत आहे, असं मला अजिबात वाटत नाही. कारण भाजपची परंपरा ही कायमंच राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि मग स्वतः अशी आहे. आमचे वडील गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर प्रीतम ताई राजकारणात आल्या. नेता हा नेता असतो, तो कुठल्याही समाजाचा नसतो, ही भाजपची संस्कृती आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आमच्यावर कायमंच वंचितांच्या समस्या सोडवण्याचे संस्कार केले आहेत. त्यामुळे ज्यांना मंत्रीपदे मिळाली आहेत त्यांनी लोकांसाठी काम करुन त्यांना न्याय मिळवून द्यावा. जो विश्वास पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर दाखवला आहे, तो त्यांनी सार्थ ठरवावा अशा शुभेच्छाही पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत.
पक्ष मोठा होणार असेल आनंदंच
राजकारणात मी व्यवसाय म्हणून नाही तर व्रत म्हणून आले आहे. वंजारी समाजातील कोणालाही संधी मिळाली तर त्याचं मला वाईट वाटत नाही. पण ज्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न प्रत्येकाकडून व्हायला हवा. फक्त पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे म्हणजे वंजारी समाजाचा चेहरा नाही. तर या समाजातील इतरही अनेक चेहरे आहेत. त्यामुळे त्यांच्या रुपाने जर पक्ष मोठा होणार असेल, तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः कोरेगाव-भीमा प्रकरण : शरद पवार नोंदवणार साक्ष!)
आरक्षणाशिवाय निवडणुका नको
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होता कामा नयेत. त्यामुळे राज्य सरकारने निवडणुकांच्या आधी या राजकीय आरक्षणाबाबत योग्य तो तोडगा काढावा. तसेच ओबीसी आरक्षणासाठी केंद्राकडून आवश्यक ती मदत नव्या मंत्र्यांनी मिळवून द्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community