सुहास शेलार
२०१९ मधील पराभवाचे खापर स्वपक्षातील नेत्यांवर फोडून जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून अडगळीत गेल्याच्या चर्चा होत्या. मात्र, पंकजा यांच्या राजकीय आयुष्यात पुन्हा सुगीचे दिवस येणार असून, त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासोबत युती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे पंकजा यांची कोंडी झाली आहे. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केले होते. त्यामुळे आता युतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्याने पंकजा अस्वस्थ आहेत. त्यावर तोडगा म्हणून त्यांनी वेगळी वाट चाचपडून पहिली. परंतु, काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे गटात गेल्यास ‘मुंडे’ या आडनावाभोवतालचे वलय कायमचे निघून जाण्याच्या भीतीने त्यांनी माघार घेतली.
(हेही वाचा – Aurangzeb : राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेल्या नेत्याचे ‘औरंग्या प्रेम’)
पंकजा यांची मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर चांगली पकड आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या वारस म्हणून त्यांना मानणारा मोठा वर्ग मोठा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा यांची अस्वस्थता भाजपाला महागात पडू शकते. ही बाब ध्यानात घेऊन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा आणि धनंजय यांच्यात मनोमिलन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी पंकजा यांना थेट मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. त्याबदल्यात पंकजा केंद्रात आणि धनंजय राज्यात अशी विभागणी होईल. परळीची जागा धंनजय लढवतील, तर प्रीतमऐवजी पंकजा मुंडे बीड लोकसभा लढवून गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवतील, अशी आखणी करून दिल्याचे कळते. धनंजय यांनी नुकतीच पंकजा यांची त्यांच्या वरळीतील निवासस्थानी भेट घेऊन यासंबंधी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community