म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राज्य सरकारच्या पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलवले होते. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चौकशीनंतर आता तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.
लाच घेतल्याचा आरोप
तुकाराम सुपे यांना अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपे यांच्यावर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चौकशीनंतर अटक
बुधवारी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांना संशयित आरोपी डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घराची झडती घेताना २०२०मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत अपात्र झालेल्या ४० हून अधिक परीक्षार्थींची हॉल तिकिटे सापडली होती. सुरुवातीला आरोग्य भरती, त्यातून म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरण बाहेर निघाल्यानंतर आता म्हाडाच्या पेपरफुटीच्या अनुषंगाने टीईटीच्या अपात्र उमेरदवारांची हॉलतिकिटे सापडल्याने पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा :एखाद्याची जात उच्च म्हणून, त्याला त्याच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालय )
Join Our WhatsApp Community