अँटिलिया स्फोटक प्रकरणी परमबीर सिंगांनी ‘हा’ रचलेला बनाव!

एनआयएने विशेष सत्र न्यायालयात अँटिलीया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले.

161

अँटिलिया जवळ स्फोटके ठेवण्यामागे अतिरेकी संघटनेचा हात आहे, हा बनाव करण्यासाठी ‘जैश ए उल हिंद’ हे पत्र बनवून घेण्यासाठी एका सायबर तज्ज्ञाला तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग याने ५ लाख रुपये दिले होते, तसेच हे पत्र टेलिग्राम या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते असे ‘एनआयए’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

अंबानींकडून खंडणी उकळायची होती

एनआयएने या सायबर तज्ज्ञाच्या जबाब नोंदवला असून तो आरोपपत्रात जोडण्यात आला आहे. या सर्व कटात परमबीर सिंग हे देखील सामील असल्याचे आरोप पत्रातून जवळपास सिद्ध होत आहे. अँटिलीया जवळ स्फोटके पेरून त्यानंतर अतिरेकी संघटनेच्या नावाने धमकावून उद्योगपती मुकेश अंबानीकडून मोठ्या रकमेची खंडणी उकळण्याचा डाव या सचिन वाझे याने आखला होता, असे ही आरोप पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा : बाप असावा पण आयत्या बिळातला नागोबा नसावा! ‘चिपी’साठी राणेंनी फुशारकी मारू नये!)

१० हजार पानांचे आरोपपत्र दाखल

दरम्यान एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याचा मनसुख हिरेन हत्याकांडाच्या कटात थेट सहभाग होता, मुंबई पोलिस मुख्यालयात हा कट शिजला होता, त्यानंतर मनसुखच्या हत्येची जबाबदारी प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलार, सतीश मोटकर, मनीष सोनी आणि आनंद जाधव यांच्यावर सोपवली होती, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. एनआयएने सोमवारी विशेष सत्र न्यायालयात अँटिलीया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून त्यात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे, सुनील माने, प्रदीप शर्मासह १० आरोपीची या कटात असलेली भूमिका मांडण्यात आली आहे. शेकडो साक्षीदार, तांत्रिक पुरावे, कागदी पुरावे गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन, मोबाईल फोनचे बेनामी कार्ड इत्यादी पुरावे आरोपपत्रात जोडण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.