राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना मनी लॉन्डीरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर ईडीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र आजाराचे कारण पुढे करून परमबीर सिंग यांनी ईडीकडे वेळ मागितली आहे.
अंटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझेला अटक झाल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून बदली करून त्यांना गृहरक्षक दलाचे प्रमुख करण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी वसुलीचे पत्र मुख्यमंत्री पाठवले होते. या पत्रात त्यांनी देशमुख यांनी गैरव्यवहार करून मुंबईतील बार मधून दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.
(हेही वाचा : डिसेंबरपर्यंत ५,२०० पोलिसांची होणार भरती!)
अनिल देशमुख यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले
याप्रकरणी ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरु करून देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील घरावर छापे टाकले होते. दरम्यान याप्रकरणात सचिन वाझेचे आणि संबंधित अधिकारी यांचे जबाब नोंदवल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे. दरम्यान अनिल देशमुख यांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले. मात्र अनिल देशमुख हे अद्याप चौकशीला हजर राहिलेले नाही. ईडीकडून गेल्या आठवड्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना देखील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र सोमवारी परमबीर सिंग यांनी आजाराचे कारण पुढे करून माझ्यावर एका शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगून ईडीकडे वेळ मागितला आहे.
Join Our WhatsApp Community