परमबीर सिंग समोर आले! पण कसे?

१०० कोटी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग हेही बेपत्ता होते, अखेर देशमुख समोर आले आणि ईडीच्या ताब्यात गेले, त्यानंतर चर्चा सुरु झाली परमबीर सिंग यांची. देशमुख यांच्यावर पत्राद्वारे आरोप करणारे सिंग कुठे आहेत, अशी विचारणा होत असतानाच सिंग समोर आले, पण प्रत्यक्ष नव्हे, तर प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून चांदीवालसमोर प्रकटले आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीकडे सगळ्यांच्या नजर लागल्या आहेत.

आपल्याकडे सांगण्यासारखे शिल्लक नाही!

१०० कोटी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीकडून परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. पण, समितीने वारंवार सिंग यांना हजर राहण्याचा आदेश दिला तरी सिंग हजर राहिले नाहीत. पण सिंग यांनी चांदिवाल आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांची बाजू मांडण्याचे सोपस्कार पार पडले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मी जे काही आरोप केले होते, आता त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आपल्याकडे शिल्लक नाही. आपल्याकडे जी काही माहिती होती, ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे, असा खुलासा सिंग यांनी यात केला आहे. अनिल देशमुख यांना अटक आणि कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या प्रतिज्ञापत्राची माहिती समोर आली आहे.

परमबीर सिंग चंदीगडमध्ये?

परमबीर सिंग यांचे वकील चंद्रचूड सिंग यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे आणि त्यामध्ये परमबीर सिंग यांनी स्वतः तयार केलेले पॉवर ऑफ अटर्नी याच्यासोबत जोडलेले आहे. यावरून परमबीर सिंग चंदीगडमध्येचे असल्याचे सूचित होते. परमबीर सिंग यांनी ही पॉवर ऑफ अटर्नी चंदीगडमध्ये तयार केली आहे. कागदावर पत्ता चंदीगड असा दिला आहे. यामुळे त्यांचे वास्तव्य चंदीगडमध्ये असल्याचा संशय बळावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here