संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले; दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब

156

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी तीव्र गदारोळ झाल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. कामकाज तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वात विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला.

मागील १४ बैठकांपासून दोन्ही सभागृहांत अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याच्या मागणीसह राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मुद्यावर तीव्र गदारोळ झाला. भाजप खासदारांनी राहुल गांधींच्या लंडनमधील विधानाप्रकरणी गदारोळ केला. पण राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाल्यापासून भाजप शांत आहे. या गदारोळामुळे संसदेत एकही दिवस कामकाज झाले नाही. अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याच्या मुद्यावर ठाम असणाऱ्या काँग्रेसने इतर १२ पक्षांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सायंकाळी ठेवलेल्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अदानी प्रकरणी आम्हाला जेपीसी चौकशी हवी आहे. पण सरकार त्याला तयार नाही, ते घाबरते. अखेर अदानींची संपत्ती अवघ्या अडीच वर्षांत १२ लाख कोटींची कशी झाली? मोदीजी एकाच व्यक्तीला एवढ्या गोष्टी का देत आहेत? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. संसदेत या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही अनेकदा नोटीस दिली. पण आमची मुस्कटदाबी करण्यात आली. असे प्रथमच झाले. मी ५२ वर्षांत असे केव्हाच पाहिले नाही. सत्ताधारी पक्षाचे सदस्य गट २ वर्षांपासून सभागृहाचे कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी यावेळी केला.

(हेही वाचा – भाजपने हनुमानापासून प्रेरणा घ्यावी! भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आपण जोरदार लढा देऊ – पंतप्रधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.