मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या वादानंतर शिवसेनेसह सर्व पक्षांच्या कार्यालयांना महापालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या निर्देशानुसार सिल ठोकण्यात आले आहे. ही पक्ष कार्यालये भविष्यात खुली करून देण्याबाबत प्रशासक अनुकूल नसून आगामी निवडणुकीपर्यंत ही कार्यालये बंदच ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने केल्याचे दिसून येत आहे. परंतु आगामी महापालिका अस्तित्वात येईपर्यंत ही कार्यालये बंद ठेवल्यास या सर्व कार्यालयांना वाळवी लागण्याची दाट शक्यता आहे. कोविड काळात अशाचप्रकारे कार्यालये बंद ठेवल्यानंतर याठिकाणी वाळवी लागण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे अशाप्रकारे वाळवी लागल्यास या सर्व कार्यालयांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे.
( हेही वाचा : मुंबईच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर का संतापले?)
महापालिका मुख्यालयांमधील जुन्या हेरिटेज इमारतीच्या तळ मजल्यावर शिवसेना, भाजप, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांची पक्ष कार्यालये आहेत. महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्य संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाला कार्यालये वितरीत करण्यात आली आहेत. परंतु या निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. महापालिका बरखास्त झाल्यानंतरही आजीचे माजी झालेल्या नगरसेवकांसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मेहेरबानी खातर ही कार्यालये नगरसेवकांसाठी खुली ठेवली. परंतु शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि शिंदे गटाचे नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर शिवसेना पक्ष कार्यालय बंद करण्यात आले. त्यासोबतच भाजप, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यालयांनाही सिल ठोकण्यात आली.
दरम्यान भाजपचे माजी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह माजी नगरसेविका कृष्णावेणी रेड्डी हे पक्ष कार्यालयाच्या शेजारील बाकड्यांवर येऊन बसले. त्यानंतर महापालिका आयुक्त तसेच प्रशासक इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी चहल यांनी शिवसेनेचे कार्यालय बंद झाल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संपर्क साधून शिवसेनेसह सर्वच पक्ष कार्यालये बंद करण्याची सूचना केली आणि ही कार्यालये सिल केल्यानंतर धन्यवादही मानल्याचे चहल यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला सांगितले. हे कार्यालय सिल होण्यापासून वाचवणे आवश्यक असताना पेडणेकरांनी आयुक्तांशी संपर्क साधून सर्वच कार्यालये सिल करायला लावतानाच आपलेही कार्यालये सिल करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पेडणेकर यांच्या सूचनेनंतर हे शिवसेनेचे कार्यालय सिल झालेले असतानाच त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यावेळीही आयुक्तांनी पेडणेकर यांचा व्हॉट्सअपवरील संदेश दाखवून शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे तोंड गप्प केले होते.
भाजपच्या शिष्ट मंडळाच्या भेटीनंतरही आयुक्तांनी कार्यालय उघडून देण्यास असमर्थता दर्शवल्याने, जर ही कार्यालये बंद राहिली तर याला वाळवी लागण्याची भीती वर्तवली जात आहे. ही सर्व पक्ष कार्यालये जुन्या हेरिटेज इमारतीत असल्याने याठिकाणी वाळवी लागण्याचे प्रकार घडत असतात. या सर्व जागांचे नुतनीकरण करत या जागी पक्ष कार्यालये बनवण्यात आली आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. कोविड काळात अशाचप्रकारे ही कार्यालये बंद ठेवलेली असताना याठिकाणी वाळवी लागण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी ही वाळवी काढून साफसफाई करून घेतली होती. त्यामुळे आता जर दिर्घकाळ ही कार्यालये सुरु राहिल्यास त्याला वाळवी लागण्याची शक्यता असून यावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाऊ नये आणि भविष्यात वाळवी लागून पुन्हा त्या जागांचे नुतनीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागू नये यासाठी ही पक्ष कार्यालये प्रशासनाला सुरु ठेवावी लागतील असे काही अभियंत्यांचे मत आहे.
Join Our WhatsApp Community