पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. आज, बुधवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती, मात्र मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे राऊतांना कोर्टात वेळेत जाणं शक्य झाले नाही. मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात राऊतांना दीड तास उशिराने हजर करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच राऊतांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले होते.
(हेही वाचा – ‘…तर आम्हीही ठाकरे गटाचं दसरा मेळावा घेण्यासाठी स्वागत करू’, शिंदे गटाचे आवाहन)
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात आज असलेल्या सुनावणीसाठी राऊतांना पोहोचण्यास विलंब झाला. या झालेल्या विलंबाची नोंद कोर्टाकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी राऊतांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत एकत्रित सुनावणी झाली. यावेळी कोर्टाकडून राऊतांची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरपर्यंत त्यांना त्यांचा मुक्काम कोठडीत करावा लागणार आहे.
ईडीकडून ४ हजार पानी आरोपपत्र दाखल
अशातच संजय राऊतांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. सोमवारी संजय राऊतांवर झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीने राऊतांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले, अशा प्रकारचा आरोप या आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे.