पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी आता चांगल्याच वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे असून हा तपास सध्या महत्वाच्या टप्प्यावर असल्याचा गौप्यस्फोट ईडीने शुक्रवारी विशेष न्यायालयात केला आहे.
जामीनाला विरोध
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली. सध्या राऊत हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उत्तर देण्याचे आदेश विशेष न्यायालयाने ईडीला दिले होते. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ईडीने संजय राऊत यांच्या जामीनाला विरोध दर्शवला आहे. 1 हजार 39 कोटी 79 लाखांचा पत्राचाळ आर्थिक घोटाळ्याचा तपास सध्या महत्वपूर्ण टप्प्यावर आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संजय राऊत यांना जामीन देऊ नये, अशी मागणी ईडीकडून न्यायालयाला करण्यात आली आहे.
(हेही वाचाः सरनाईकांना ‘या’ प्रकरणी मोठा दिलासा, पोलिसांनी अहवालात म्हटले काय?)
ईडीची न्यायालयात मागणी
याआधी 8 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत देखील ईडीने या घोटाळ्यात संजय राऊत यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत, असे सांगितले होते. राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर झालेला 1 कोटी 8 लाख रुपयांचा व्यवहार देखील संशयास्पद आहे. असे अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला सापडले असून त्याचा सखोल तपास ईडीला करायचा आहे. संजय राऊत हे राजकीय व्यक्तिमत्व असल्याने ते तपासात आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. तसेच राऊत यांनी एका महिलेला याबाबत धमकावले असल्याचेही ईडीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे राऊत यांना जामीन नाकारण्यात यावा, अशी मागणी ईडीने न्यायालयात केली आहे.
Join Our WhatsApp Community