मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या घरावरील छापेमारीदरम्यान, त्यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे. मात्र यातील १० लाखांच्या बंडलवर एकनाथ शिंदे अयोध्या असे लिहिल्याचे आढळले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेना थेट विचारणा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या ११ लाख ५० हजार रूपयांच्या रोख रक्कमेपैकी १० लाख रूपयांच्या एका बंडलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आढळून आल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव होते याची माहिती मला नाही. माझ्याकडे चौकशी करण्यापेक्षी ज्याच्या घरात सापडले आहेत, त्यांच्याच घरी चौकशी करा. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर ते राऊतांनाच विचारा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
(हेही वाचा – पक्ष फुटल्यानंतर उपनेतेपदासाठी ठाण्यातील महिलेची शिवसेनेला झाली आठवण)
राऊतांच्या घरी शिंदेंच्या नावाचा बंडल
संजय राऊत यांना मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे. साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर राऊतांना त्यांच्या भांडुपमधील मैत्री निवासस्थानातून ताब्यात घेतले. त्यानंतर ईडीने त्यांना फोर्ट परिसरातील ईडीच्या कार्यालयात आणले. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याच्या घरावर करण्यात आलेल्या छापेमारीत ११ लाख ५० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कुठून आली, याची त्यांना विचारणा कऱण्यात आली. त्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे अयोध्या असे लिहिलेला पैशांचा बंडल देखील राऊतांच्या घरी सापडला, हे पैसे पक्षाच्या कामासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.