‘मला अटक करणे ही देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी चूक होती, हे आता त्यांना कळेल’, असा दावा संजय राऊत यांनी तुरुंगाबाहेर पडल्यानंतर केला. मात्र, पत्राचाळ घोटाळा आणि त्यासंदर्भात भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात त्यांना फटकारले असून, संजय राऊतांनी गैरव्यवहार केला नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या.
‘प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी वादासाठी अटक केली, तर संजय राऊतांना कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद राहिली आहे. ईडीनेही हे त्यांच्या तक्रारीत मान्य केले आहे. मात्र, तरीदेखील म्हाडाच्या एकाही अधिकाऱ्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले नाही. ठराविक लोकांनाच अटक करण्याची ईडीची वृत्तीच दिसून येते’, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला फटकारले.
यासंदर्भात बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी ठराविक लोकांना अटक करत आहे, यात काहीच शंका नाही. मुख्य आरोपींना अटक न करता, ईडीने मर्जीच्या आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे ईडीचा सर्रास गैरवापर होतोय हे खरे; पण यामुळे राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही, असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community