यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होतेय ती बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाची. या ठिकाणी लोकसभेसाठी मतदान झाल्यावर आता बारामतीत विधानसभेची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीचे (Baramati) आमदार आहेत. त्यांच्याविरोधात कोण उभं राहणार, या प्रश्नाचे उत्तर युगेंद्र पवार असू शकते, असे शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनीवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जे आता प्रचारासाठी फिरत आहेत ते तुम्हाला सात तारखेनंतर कुठेही दिसणार नाहीत, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीतल्या (Baramati) पक्ष कार्य़ालयात आले असून मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहे, तसेच प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी विधानसभा क्षेत्रातील पक्ष कार्यालयात येऊन जनसामान्यांच्या अडीअडचणी ऐकून घेणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
युगेंद्र पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत. मात्र, सध्या ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्यावरती फोडाफोडीच्या राजकारणाचा शिक्का लावला जातो. त्यातच काका पुतण्याचा वाद हा राजकारणात देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो. आज काका पुतण्याचा वाद आता येणाऱ्या विधानसभेत देखील बारामतीमध्ये (Baramati) दिसू शकतो.
Join Our WhatsApp Community