राज्यात येणाऱ्या ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीत पेंग्विन सेनेने आडकाठी करू नये – आशिष शेलार

120

शिंदे-फडणवीस सरकारच्या प्रयत्नाने ७० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येऊ घातली आहे. युवक युवतींसाठी कमी वेळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चांगले काम केले आहे. युवकांना याचा लाभ होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेला विनंती आहे, त्यांनी यात कुरापती काढू नयेत; आडकाठी आणू नये, अशी टीका आमदार ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी केली.

दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेलार म्हणाले, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी राज्यात येणाऱ्या विकासकामांचे स्वागत करायला हवे, पण त्यांना राजकारण करण्यात अधिक रस आहे. सुषमा अंधारे यांची आधीची वक्तव्ये संत आणि हिंदू धर्माला संताप आणणारी आहेत. त्यांचे देवदेवतांची टिंगल करणारे व्हीडिओ सर्वदूर झाले आहेत. त्यांनी पूर्व आयुष्यात केवळ हिंदुत्व आणि हिंदू धर्मावर टीका केली आहे. आता वारकरी संप्रदायावर टीका केली आहे. त्यांना माफी मागावीच लागेल. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांची सेना हरकत घेणार का? त्यांच्यावर उद्धव ठाकरे कारवाई करणार का? की, त्यांना समर्थन आहे? उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता सुषमा अंधारे या जवळच्या वाटत आहेत. याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांची विटंबना करणाऱ्या अंधारेंवर गुन्हा दाखल करा, संत तुकाराम महाराजांच्या वंशजांची मागणी)

नक्षलवादाचे समर्थन करायचे आहे का?

साहित्यिकांच्या पुरस्कार वापसीबद्दल शेलार म्हणाले, जे साहित्यिक पुरस्कार परत करणारे आहेत त्यांनी सांगावे त्यांचे नक्षलवादाला प्रोत्साहन आहे का? महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरजिल उस्मानी याला राज्यात फिरवले, त्यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते त्यांनी काही कारवाई केली नाही, अशा पक्षांनी आम्हाला काही शिकवू नये. पुस्तकामध्ये नक्षलवादाचे समर्थन करण्यात आले आहे, ते सरकारला मान्य नाही, असे स्पष्ट कारण सरकारने दिले आहे आणि ते योग्य आहे. मग जे पुरस्कारावर बोलत आहेत, त्यांना नक्षलवादाचे समर्थन करायचे आहे का? मूळ विषयावर आपली भूमिका स्पष्ट करा, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.