शिवसेने पाठोपाठ भाजपचाही महापालिकेच्या मुदत ठेवीवर डोळा

मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना महापालिकेने स्वखर्चातून मोफत लसीकरण करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.

111

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींवरच आता सर्व पक्षांची नजर असून, शिवसेनेने जिथे लसीकरणासाठी ७० हजार कोटींच्या मुदतठेवीतून पाच हजार कोटी रुपये राज्य सरकारला देण्याची मागणी केली आहे. तिथे भाजपनेही याच मुदत ठेवींकडे बोट दाखवत, मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना महापालिकेने स्वखर्चातून मोफत लसीकरण करावे, अशी मागणी केली आहे.

मोफत लसीकरणाची मागणी

मुंबईतील लसीकरणाच्या मुद्दयावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, आमदार आशिष शेलार, महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा आदींच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणानुसार खासगी रुग्णालय आण राज्य सरकार आता लसींच्या ५० टक्के उत्पादनाची थेट खरेदी करू शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या माध्यमातून या लसींची खरेदी करुन मोफत लसीकरणाला सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळाने केली.

(हेही वाचाः ड्राईव्ह इन लसीकरण हे गरीबांसाठी नव्हे तर श्रीमंतासाठीच… समाजवादी पक्षाचा आरोप)

३५० कोटींचा खर्च

२०११च्या जनगणनेनुसार, मुंबईमध्ये १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ५८ लाख ५० हजार नागरिक आहेत. दोन डोसचे ६०० रुपये याप्रमाणे हा खर्च साधारणत: ३५० कोटी रुपयांचा आहे. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता महापालिका हा खर्च करू शकते. त्यामुळे हा निर्णय त्वरित घेऊन लस निर्मिती कंपन्यांना खरेदीसाठी पैसे देऊन ही मागणी राज्य सरकारच्या मार्फत नोंदवावी, अशी त्यांनी सूचना केली आहे. मुंबईकरांना ही लस मिळावी याकरता आधार कार्ड इत्यादी माध्यमातून याची आखणी करता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईला जादा लस पुरवण्यासाठी आग्रह

४५ वर्षांवरील लोकांना केंद्र सरकारकडून जो लस पुरवठा राज्य सरकारच्या मार्फत होत आहे, त्यातील लोकसंख्या व कोविडबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईला जादा पुरवठा करण्यासाठी आपण राज्य सरकारकडे आग्रह धरावा, अशीही मागणी दरेकर यांनी केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.