…म्हणून सर्वसामांन्यांना लोकलसाठी अजून बघावी लागणार ‘वाट’!

राज्य सरकार आणि पालिका प्रशासनामध्ये बैठक झाली, यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकल सुरू करण्यास विरोध केल्याची माहिती मिळत आहे.

91

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी झाल्याने, राज्य सरकारने निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने रुग्णांच्या टक्केवारीवरुन, कोणता जिल्हा कोणत्या टप्प्यात आहे हे जाहीर केले. त्यातच आता मुंबईची आकडेवारी देखील कमालीची घटू लागल्याने, आता मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य मुंबईकरांना होती. मात्र आता सर्वसामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवसावर विरजण पडले असून, मुंबई महापालिकेने अजून तरी लोकल सुरू करायला हिरवा कंदील दिलेला नाही. त्याचमुळे आणखी काही दिवस सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू होणे कठीण आहे. लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनामध्ये बैठक झाली, यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकल सुरू करण्यास विरोध केल्याची माहिती मिळत आहे.

पालिकेला वाटते रुग्णवाढीची भीती

जर सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवास खुला केला, तर पुन्हा मुंबईमध्ये कोरोना रुग्ण वाढू शकतात. पहिल्या लाटेनंतर जी चूक झाली त्याचा परिणाम दुसऱ्या लाटेत मुंबईला सर्वात झाला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मुंबईत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले. याचमुळे जरी आता मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला, तरी लोकल सुरू करण्याची घाई करू नये, असे महापालिकेकडून राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानेच लोकल सुरू करण्याबाबत सावधपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यात यावा, असे महापालिकेने राज्य सरकारला सांगितल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः सोमवारपासून एसटीची मुंबईतील सेवा होणार बंद! सर्वसामान्य कसा करणार प्रवास?)

सरकारमध्येही दोन गट

एकीकडे पालिकेचा लोकल सुरू करण्याला विरोध असताना, ठाकरे सरकारमध्ये देखील लोकल सुरू करण्यावरुन दोन गट आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे आता हळूहळू सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरू करायला हरकत नसल्याचे मत आहे. तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अजूनही लोकल सुरू करण्यास विरोध असून, त्यांनी तो निर्णय स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या माहितीवरुनच घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

(हेही वाचाः मुंबई लोकल सर्वांसाठी बंदच! लेव्हल ३ची बंधने लागू! )

हा महिनाही लोकलसाठी प्रतीक्षा करावी लागणार

मुंबई शहराचा तिसऱ्या स्तरात समावेश करण्यात आल्याने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेचा वापर करता येईल. सर्वसामान्यांना या आठवड्यात रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार नाही. रुग्णसंख्या आणखी कमी होईपर्यंत या महिन्यात तरी सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करण्याची मुभा दिली जाणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार? लवकरच लोकलचा निर्णय होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.