दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे’ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर तसेच वाहतूक बेटावर महानगरपालिकेच्या ए विभागाच्या वतीने कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे हा पुतळा व वाहतूक बेटासह फोर्ट परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांनी १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले आणि विद्युत रोषणाईची पाहणीही केली. एलईडी दिव्यांच्या झोतात उजळून निघालेला पुतळा, वाहतूक बेट पाहून मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी रश्मी उद्धव ठाकरे, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. मिलिंद नार्वेकर, उपायुक्त (परिमंडळ १), विजय बालमवार, ए विभाग सहायक आयुक्त श्रीमती चंदा जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुतळा आणि वाहतूक बेटावर विद्युत रोषणाई करण्यासाठी ५० वॅटचे फ्लड लाईटसह २४ वॅटचे वॉल वॉशरचा ठिकठिकाणी उपयोग करण्यात आला आहे.
(हेही वाचा : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी वादाला सुरुवात! उद्धव ठाकरे करतील का खुलासा?)
Join Our WhatsApp Community