मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा सांगण्यात येत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आता शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळावा दादारच्या शिवाजी पार्कवर घेण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये चुरस सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून महापालिका प्रशासनाला शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आले आहेत. पण याचबाबत आता महत्वाची माहिती समोर येत असून यंदाच्या दस-या शिवाजी पार्क मोकळेच राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन्ही गटांना परवानगी नाकारणार?
शिवसेनेचा दसरा मेळावा हा पंरपरागत असून तो गेल्या अनेक वर्षांपासून दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात येतो. पण आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणा-या शिंदे गटाने या मेळावाव्यावर देखील आपला हक्क सांगत मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अर्जानंतर लगेच अर्ज केला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी नेमकी कोणाला परवानगी द्यावी याबाबत महापालिका संभ्रमात आहे. त्यामुळे द्विधा मनस्थितीत असलेली महापालिका दोन्ही गटांना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी परवानगी नाकारू शकते, अशा चर्चा आता सुरू आहेत.
(हेही वाचाः शिवाजीपार्क दसरा मेळावा प्रकरणी महापालिका विधी विभागाचा अभिप्राय घेणार?)
महापालिकेचा ‘सेफ’ पवित्रा
खरी शिवसेना कोणाची हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याबाबत मुंबई महापालिका विधी विभागाचा अभिप्राय मागवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणाही एकाला परवानगी दिल्यास त्यातून प्रशासनाचे अधिकारी भरडले जाणार असून, भविष्यात या निर्णयामुळे महापालिकेच्या भूमिकेला कुणी न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर तिथेही ठामपणे मत मांडता यावे यासाठी कायदेशीर अभिप्राय विधी विभागाकडून मागवून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
तसेच अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवसांमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या राडेबाजीमुळे शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन गटांमध्ये होत असलेल्या हाणामारीमुळे आणि राडेबाजीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत गृहखाते संबंधितांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारु शकतात.
(हेही वाचाः शिवसेनेच्या राडेबाजीमुळे दसरा मेळाव्याच्या अडचणी वाढल्या!)
Join Our WhatsApp Community