शनिवारी शिवसेना भवनसमोर हनुमान चालीसा: मनसेने मागितली मुख्यमंत्र्यांकडे परवानगी

155

शिवसेना भवनला शिवसैनिक आणि मुख्यमंत्री मंदिर मानतात, मग त्या भवनासमोर हनुमान चालीसा लावली तर इतका द्वेष का असावा. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात असा सवाल मनसेचे दादर-माहीमचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांमुळे शिवसेना भवन हे तुमच्यासह सर्व हिंदूचे श्रद्धास्थान (मंदिर) आहे. त्यामुळे शनिवार १६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सेना भवन मधील भवानी मातेच्या मंदिरात आम्हा मनसैनिकांना हनुमान चालीसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.

(हेही वाचा – भाजपकडून राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदी ‘महिला’राज!)

मनसेने लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

मनसेचे किल्लेदार यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या या पत्रात, रविवारी रामनवमीचे औचित्य साधत महाराष्ट्र सैनिकांनी हनुमान चालीसा रथ यात्रेचे आयोजन केले होते. याचा शुभारंभ मंदिराप्रमाणे असणाऱ्या शिवसेना भवन इथून करण्यात आला. मात्र यावर सरकारने ती रथ यात्रा रद्द करत उलट आमच्यावर कारवाईचा बडगा उचलला. हा रथ श्रीराम उत्सवाच्या ठिकाणी तसेच राम मंदिराच्या ठिकाणी लावला जाणार होता. ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले तसेच अत्याचार राज्याचे मुख्यमंत्री आमच्यावर करत आहेत, अशी आमची भावना झाली तर गैर काय असाही सवालही किल्लेदार यांनी केला आहे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत सेना भवनला शिवसैनिक आणि मुख्यमंत्री मंदिर मानतात, मग हनुमान चालीसा लावली तर इतका द्वेष का असावा. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात हेच समजेनासे झालेय.

तर चालीसा लावल्यावर का कारवाई केली?

आपण जनतेच्या हितासाठी हिंदुत्वसाठी महाविकास आघाडी बरोबर एकत्र आलो असल्याचे वक्तव्य केलेत. जर तुम्ही हिंदुत्वसाठी एकत्र आलात तर मग मनसैनिकांनी हनुमान चालीसा लावल्यावर तुम्हाला कारवाई का करावीशी वाटली? असाही मुद्दा उपस्थित केला आहे. जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मग सतत आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे का बोलावे लागते याचे उत्तर आपण द्याल का याचाही जाब विचारला. आमचा कुठल्याही धर्माबद्दल अथवा त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही, मात्र ते ज्या पद्धतीने एकतर्फी कारवाई होत आहे, त्या पद्धतीला विरोध आहे. एरव्ही आम्ही रमजानच्या दिवसात मुस्लिम बांधवांच्या घरी जातो तसेच गणेशोत्सवात ते आमच्या घरी येतात.

…म्हणून आरती करण्याची परवानगी द्यावी

शिवसेनेतील नेते मंडळी समाज माध्यमाच्या माध्यमातून सेना भवनमध्ये असलेल्या भवानी मातेच्या मंदिरा समोर आरती करण्याचा सल्ला देतात. केवळ म्हणूनच मी या पत्राद्वारे आपणांस विनंती करतो की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांमुळे शिवसेना भवन हे तुमच्यासह सर्व हिंदूचे श्रद्धास्थान (मंदिर) आहे. त्यामुळे शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिनी सेना भवन मधील भवानी मातेच्या मंदिरात आम्हा मनसैनिकांना हनुमान चालीसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी.

आमचा पक्ष संपलेला, तर आमच्यावर कारवाई का?

मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही अशी टीका टिपणी आदित्य ठाकरे यांनी केली. मग पक्ष संपलेला असेल तर तुम्हाला कारवाईचा आधार का घ्यावा लागतो. मनसेच्या वसंत मोरे यांना फोन का करावा लागतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या मित्राच्या फोनवरून मला पक्षात येण्यासाठी फोन करण्याची गरज का भासली. करोडो रुपये खर्च करून नगरसेवक का पळवावे लागतात. मनसेची स्थापना झाल्यापासून १६ वर्षे राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी, दुष्काळ, भ्रष्टाचार यावर ओरडत होते, तेव्हा आपण मनावर घेतले नाही आणि एक भाषण थोडे वेगळे काय केले (त्यातही ते मुद्दे बोलेले होते) लगेच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना ब्लू प्रिंट, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे आठवावे लागले, याचे स्मरण करून दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.