मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदाचा वाद पोहोचला न्यायालयात

155

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मीरा-भांईंदर महापालिकेच्या आयुक्तपदाच्या वादासंबंधी ही याचिका दाखल करण्यात आली असून हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.

दिलीप ढोले यांची मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सांगत सनदी अधिकारी नसतानाही ढोले यांना हे पद देण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. शनमुगम या समाजसेवकाने ही याचिका दाखल केली असून या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे याचिका?

केवळ आयएएस अधिका-यांचीच नियुक्ती पालिका आयुक्त पदी करण्यात यावी असे शासनाच्या 4 मे 2006 च्या अध्यादेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पण मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झालेले दिलीप ढोले हे आयएएस नसतानाही त्यांची आयुक्तपदी निवड कशी करण्यात आली, असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरसुद्धा ही निवड अजूनही कायम का ठेवण्यात आली आहे, असा सवालही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तत्त्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही निवड केल्याचा आरोपही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

(हेही वाचाः प्राथमिक शिक्षकांची ३१ हजार पदे रिक्त; दर्जेदार शिक्षण मिळणार कसे?)

या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव,मीरा-भाईंदर महापालिका आणि महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

कोण आहेत दिलीप ढोले?

यापूर्वी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) च्या प्रभारी आयुक्तपदी ढोले कार्यरत होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची बदली नगर विकास खात्यात करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये कोरोना काळात त्यांची नियुक्ती मीरा-भाईंदर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी केली गेली. 2021 मध्ये त्यांची नियुक्ती मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.