राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची मागणी होत असतानाच आता याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यपालांच्या विरोधात याचिका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दीपक जगदेव यांनी उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या विधानामुळे समाजातील शांतता आणि एकोपा बिघडल्याचा आरोप या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचाः ‘हिमालयातून आलेल्या राज्यपालांना कळावं म्हणून…’, मनसेने राज ठाकरेंच्या आवाजात प्रसिद्ध केलेला व्हिडिओ नक्की बघा)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा देखील राज्यपालांनी अपमान केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
राज्यपालांचे वादग्रस्त विधान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. आपल्या भाषणात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली होती. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून,विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.