राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप असलेल्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार असून, मारहाणीची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
( हेही वाचा : सर्व सरकारी बॅंकांसाठी एकच हेल्पलाईन क्रमांक; ग्राहकांच्या समस्यांचे होणार निवारण)
घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना पकडून आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्यावेळी आव्हाड तेथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती.
त्यानंतर करमुसे यांच्या तक्रारीनुसार वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटक करून जबाब नोंदवला आणि त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दहा हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर केला होता.
आव्हाड यांना झाली होती अटक
१४ ऑक्टोबर २०२१ रोजी जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र, ठाणे न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. आता पुन्हा याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीची याचिका आधी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने ती फेटाळून लावली होती.
Join Our WhatsApp Community