मालेगाव बॉम्बस्फोटानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Paramvir Singh) यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अटकेचे आदेश दिले होते, अशी खळबळजनक बाब मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीत समोर आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची विशेष एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील याचिकेच्या सुनावणीवेळी संशयित सुधारक द्विवेदी यांच्या वतीने वकील रणजित सांगळे यांनी युक्तिवाद करताना उपरोक्त दावा केला आहे.
वकील सांगळे म्हणाले, परमबीर सिंग (Paramvir Singh) यांनी एटीएसचे तत्कालीन अधिकारी महबूब मुजावर यांना बोलावले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना नागपूरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलण्याचे आणि मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते. पण हे आदेश तोंडी असल्याने त्यांनी त्याचे पालन केले नाही. परिणामी, मुजावर यांना सोलापुरातील एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. मुजावर यांनी सोलापूर कोर्टात दिलेल्या जबाबात ही माहिती उजेडात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा व हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक पसरवण्यासाठीच होता, असा दावाही वकील सांगळे यांनी यावेळी आपल्या यक्तिवादात केला.
(हेही वाचा Bombay High Court ने पोलिसांना फटकारले; म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यांविषयीचा कारभार सुधारा’)
परमबीर सिंग अडचणीत
माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी आधीच मीडियाला माहिती देताना सांगितले की, संदीप डांगे आणि रामचंद्र कलसांग्रा एटीएसच्या कोठडीत मृत्यू पावले होते. परंतु विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एटीएसच्या आरोपपत्रात त्या दोघांना जिवंत दाखवण्यात आले. आता एटीएसला ते हवे आहेत, असे वकील सांगळे यावेळी म्हणाल्याची माहिती आहे. या खुलाशामुळे परमबीर सिंग (Paramvir Singh) यांचे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाशी असणारा संबंध उजेडात आला आहे.
Join Our WhatsApp Community