कोणताही मोठा उद्योग वा नोकरी न करता उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी जमवलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीचा हिशोब द्यावा, अशी मागणी करीत दादरमधील एका महिलेने थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. बुधवारी ही याचिका न्यायालयासमोर आली असता, न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दाखल करण्याकरिता याचिकाकर्त्यांना १४ दिवसांची वेळ देण्यात आली.
( हेही वाचा : दिवाळीपूर्वी FDA ची मोठी कारवाई; मुंबईत ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त )
दादरच्या रहिवासी असलेल्या गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे बुधवारी यासंदर्भात सुनावणी झाली. सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून इतकी संपत्ती जमा होणे, मातोश्री-२ सारखी इमारत, महागड्या गाड्या, फार्महाऊसेस विकत घेणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे ठाकरेंचे उत्पन्न आणि संपत्ती याचा मेळ लागत नाही. ठाकरेंनी गोळा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली.
याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने याचिकेवर काही आक्षेप नोंदवले. ते दूर करण्यासाठी याचिकाकर्त्यांना १४ दिवसांचा वेळ देत सुनावणी तहकूब करण्यात आली. याचिकेतील आक्षेप दूर करा, मग आम्ही सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले.
सामना, मार्मिकच्या विक्रीतून इतकी संपत्ती अशक्य…
- उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात आम्ही ११ जुलै २०२२ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. २०१९ पासून काही गोष्टी समोर आल्या, पुरावे हाती लागले. ते घेऊन आम्ही कोर्टापुढे आलो आहोत.
- मी ठाकरे कुटुंबाला जवळून ओळखते. माझे आजोबा बाळासाहेबांना चांगले ओळखायचे. मला या कुटुंबाविरोधात काही पुरावे मिळाले म्हणून मी याचिका दाखल केली.
- आदित्य ठाकरेंनी २०१९ मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले. ते कुठे नोकरी करत नव्हते, मग त्यांच्याकडे कोट्यवधी रूपयांची संपत्ती कशी आली? हा माझा सवाल आहे.
- सामना आणि मार्मिक प्रकाशित करणाऱ्या ‘प्रबोधन’ छापखान्याशेजारी माझ्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ प्रकाशन छापखाना होता.
- सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती जमा होणे, मातोश्री २ सारखी इमारत, महागड्या गाड्या, फार्महाऊसेस विकत घेणे निव्वळ अशक्य आहे. आमचाही हाच व्यवसाय आहे. मग संपत्तीत जमीन अस्मानाचा फरक कसा, असा सवाल याचिकेतून उपस्थित केल्याची माहिती भिडे यांनी दिली.