“प्रत्येक राज्यात ‘एम्स’ची स्थापना करणं हे पंतप्रधानांचं स्वप्न!”

91

प्रत्येक राज्यात एम्सची स्थापना करणे हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. परिणामस्वरूप आत्तापर्यंत एकूण 22 एम्सची मंजुरी मिळाली आहे. एम्सच्या स्थापनेसोबतच, आधुनिक उपचार सुविधा विकसित करणे आणि कुशल डॉक्टरांची संख्या वाढवणे याला प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून गरिबांना परवडणारे उपचार मिळू शकतील, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या. कल्याणी येथील एम्सच्या 2021 च्या एमबीबीएस बॅचच्या उद्घाटन सोहळ्यात सोमवारी दूरदृश्य माध्यमातून त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांचे आणि प्रशासनाचे अभिनंदन करताना, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी 125 एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या तुकडीसह सुरू होत असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, कल्याणीच्या 2021 च्या तिसऱ्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभाबद्दल आनंद व्यक्त केला.

आरोग्याच्या क्षेत्रात एम्स कल्याणी मैलाचा दगड ठरणार

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे की भविष्य हे आरोग्य सेवेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या समाजाचे आहे. या पवित्र उद्दिष्टाचे उदाहरण म्हणजे कल्याणी एम्स, जे 1,754 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे, जे 179.82 एकरमध्ये वसलेले 960 खाटांचे रुग्णालय असेल. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे तीन स्तंभ आहेत – विविध विषयांचे वैद्यकीय शिक्षण, बायोमेडिकल सायन्समधील संशोधन आणि उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा प्रदान करणे. पश्चिम बंगालमधील आरोग्याच्या क्षेत्रात एम्स कल्याणी मैलाचा दगड ठरेल आणि लवकरच एक उत्कृष्ट संस्था म्हणून नावारूपाला येईल यात शंका नाही,” त्या पुढे म्हणाल्या.

(हेही वाचा – एसटी संपाचं ‘ते’ पत्र व्हायरल; संपकरी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार?)

लोकांपर्यंत स्वस्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार

नीट 2021 परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या आणि एम्स कल्याणीच्या एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यासोबतच त्यांनी आपल्या मुलांमध्ये मानवसेवेची भावना रुजवणाऱ्या भारतातील या भावी डॉक्टरांच्या पालकांचेही अभिनंदन केले. आणि, लोकांना एकत्र काम करण्याची आणि एम्स, कल्याणी पूर्ण क्षमतेने काम करत असल्याची खातरजमा करण्याची विनंती केली. केंद्रीय राज्यमंत्री म्हणाल्या की, एम्स कल्याणीद्वारे बंगालमधील लोकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, जेणेकरून तळागाळातील लोकांपर्यंत स्वस्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न लवकरात लवकर साकार होईल. एम्स दिल्लीच्या माजी संशोधन अधिष्ठाता डॉ चित्रा सरकार, आणि एम्स कल्याणीचे अध्यक्ष, डॉ रामजी सिंग, एम्स कल्याणीचे कार्यकारी संचालक आणि इतर वरिष्ठ प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थ्यांचे कुटुंबीय या सोहोळ्यात उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.